पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२८) वाद करण्याचा सुदिन आला असल्याने मी त्रिवार धन्य आहे. विजयश्रीचा जयमहोत्सव आज आपण होऊन मजकडे चालत आला आहे. अगणित शास्त्रांचे केलेले परिशीलन आज मला फलद्रूप होवो. उद्यां आपण वादास सुरवात करूं. याप्रमाणे भाषणे झाल्यावर वादास मध्यस्थ कोण करावा याची चर्चा झाली. जैमिनीने सांगितले की, मंडन पंडिताची भार्या सरस्वतीच हे काम उत्तम करील याप्रमाणे ठरले. त्या दिवशी श्राद्धकर्म संपल्यावर व्यास जैमिनी गुप्त झाले. दुसरे दिवशी ठरल्याप्रमाणे वादास प्रारंभ झाला. सरस्वती मध्यस्थ झाल्यावर आचार्यांनी पुढील प्रतिज्ञा केली. 'ब्रह्म ही एकच नित्य वस्तु आहे, व सर्व जगत् हे मिथ्या आहे, हा विषय प्रतिपादन करतांना जर माझा पराजय झाला तर कर्ममार्ग स्वीकारून मी गृहस्थाश्रमी होईन.' मंडनमिश्रानेही आपली प्रतिज्ञा उच्चारली- 'कर्मानेच मुक्ति मिळते ' हा माझा निश्चित् सिद्धांत आहे. तो प्रतिपादन करतानां मी जर हरलों गेलों, तर तुम्ही केलेल्या प्रति- ज्ञेच्या उलट म्हणजे कर्ममार्ग सोडून मी चतुर्थाश्रमाची दीक्षा घेईन.' ज्याच्या गळ्यांतील माळ आधीं सुकेल तो जिंकला गेला हे समजण्याकरितां शारदेने ( सरस्वतीने ) दोघांच्याही गळ्यांत फुलांचा एक एक हार घातला. वाद सुरू झाल्यावर अंतरिक्षांत देव-गंधर्वांची व वादस्थळी विद्वान लोकांची भयंकर गर्दी झाली. मुद्देसूद व निर्वाणीच्या वीरश्रीनें तो वाद सारखा पंधरा दिवस कडाक्याने झाला. वादाचे शेवटी मंडन०-तुमच्या मताला पुष्टिकारक अशी प्रमाणवाक्ये तुमच्याजवळ नाहीत. तेव्हां आचार्य म्हणाले,-तत्वमस्यादि श्रुति- वाक्येच याला प्रमाण आहेत. यावर त्या श्रुतिवाक्याचेही मंडन- ,