पान:व्यायामशास्त्र.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ११६ ] अन्न शरिरांत जाईल तितकें शरीर पुष्ट होईल. शरिरास अन्नाचा उपयोग होण्यास अन्नाचे योग्य पचन झाले पाहिजे. अन्नाचे पचन झालें नाहीं तर अन्नापासून शरिरास फायदा होणार नाहीं; एवढेच नव्हे, तर अपायही होईल. म्हणून आपणांस जेवढे अन्न पचविता येईल, तेवढेच आपण खाल्ले पाहिजे. अन्नाच्या ज्या भागाचा शरिरास उपयोग नाहीं, ते शरिरांतील भिन्न मलद्वारांनी बाहेर टाकून द्यावे लागते; व हे काम करण्यामध्ये शरि - राच्या शक्तीचा विनाकारण व्यय होत असल्याकारणानें, पाहिजे त्यापेक्षा जास्त अन्न शरिरांत गेल्याने शरिराची शक्ति न वाढतां उलट शरिरास अशक्तपणा येतो. वाजवीपेक्षा जास्त खाल्याने जेवणानंतर सुस्ती येते, एवढेच नव्हे, तर दुस-या दिवशीं नेहमीपेक्षा हुषारी कमी वाटते, असा आपणांस जो अनुभव येतो, त्याचे कारण हेच आहे. म्हणून अन्नासंबंधाने हे लक्षात ठेविले पाहिजे की, अन्न पुष्टिकारक आहे ही गोष्ट जरी खरी आहे, तरी आपणांस जेवढे अन्न पचविता येते, तेवढ्यापासूनच शरिरास फायदा होतो, व त्यापेक्षा जास्त अन्न खाल्यापासून उलट अपाय होतो. शरिराच्या रोजच्या जरूरीपेक्षा जास्त व आपल्या पचनशक्तीच्या बाहेर खाल्लेले अन्न विषवत् होय; म्हणून मर्यादेबाहेर अन्न कधीही खाऊ नये. अन्न तेवढे चांगलेंच, म्हणून जेवढे अन्न पोटांत जाईल तितकें शरीर अधिक पुष्ट होईल, अशा समजुतीने, शिळे व नासलेलें अन्न खाण्याचा किंवा मर्यादेबाहेर अन्न खाण्याचा जो कांहीं लोकांचा प्रघात आहे, तो अत्यंत अपायकारक व त्याज्य आहे.