पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८७
मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य

यशस्वी होईल, जुनी भांडवलशाही समाजरचना नष्ट करून तिच्या जागी साम्यवादी समाजरचना निर्माण करण्यास कामगार हाच समर्थ आहे, असा एक सिद्धान्त आहे. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या मार्क्सवादाच्या आद्यग्रंथापासून आजपर्यंत झालेल्या देशोदेशींच्या बहुतेक सर्व ग्रंथांमध्ये हा सिद्धान्त आवर्जून सांगितलेला आढळतो. गेल्या शतकामध्ये जगातील बहुतेक देशांत भांडवलशाहीची सत्ता प्रस्थापित झाली होती, आशिया खंडातील चीन, तुर्कस्थान, अरबस्थान, यांसारख्या देशांत जुन्या सरंजामशाहीचे अवशेष अजूनही होते. पण तेथेही भांडवलशहांचेच अधिराज्य स्थापन झाले होते. अशा या सर्व सत्ताधीश भांडवलशहाला प्रतिकार करून त्याच्याशी सामना देऊन, लढा करून त्याचे निर्दालन करण्याचे सामर्थ्य मार्क्सच्या मते फक्त अर्वाचीन शहरांतील गिरण्याकारखान्यांतून भांडवलशाहीबरोबर निर्माण झालेला जो कामगारवर्ग त्याच्याच ठायी असू शकते. बुद्धिजीवी वर्ग, व्यापारी, शेतकरी इ. वर्ग हे या कार्याची धुरा अंगावर घेण्यास कोणत्याही दृष्टीने लायक नाहीत. धनसत्तेला वश होऊन यापैकी बहुतेक भांडवलाचे दास होतात. किंवा अज्ञान, दुफळी, उदासीनता यांमुळे या मोठ्या कार्याला लागणारे सामर्थ्य त्यांच्या ठायी निर्माण होऊ शकत नाही, असे मार्क्सचे मत होते.
 मार्क्स, एंगल्स यांनी हे मत सांगितल्याला शंभर वर्षे होऊन गेली; तेवढ्या अवधीत जगाच्या एकंदर स्वरूपात जमीन-अस्मानाचे अंतर पडले आहे. अनेक देशांत क्रांत्या झाल्या, अनेक साम्राज्ये रसातळास गेली, कित्येक नवी राष्ट्रे उदयास आली. विज्ञानाची कल्पनातीत प्रगती होऊन जीवनाविषयीचा मानवाचा दृष्टिकोनच पालटून गेला; धनसत्ता, वांशिक, गुण, भौगोलिक परिस्थिती याचे नव्याने मूल्यमापन झाले, आणि या सर्वांमुळे भिन्न जमाती, वंश, वर्ग यांच्या अंगच्या सुप्त गुणांची प्रतीती आली व पूर्वी मानलेल्या कल्पना फोल ठरल्या. एवढे परिवर्तन झाल्यावर 'कामगार हाच क्रांतीचा नेता' या मार्क्समतात काही फरक पडला असेल, त्याच्या अनुयायांनी त्याला काही मुरड घातली असेल, असे वाटणे साहजिक आहे. पण तसे फारसे झालेले नाही. मार्क्सच्या मूळ तत्त्वज्ञानालाच जगातल्या पंडितांनी हटकले आहे. आणि कित्येकांनी त्याचे खंडनही केले आहे. पण मार्क्सचे अनुयायी म्हणून जगात