पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
वैयक्तिक व सामाजिक

 पण दैवविलसित असे विचित्र आहे की याच वेळी कार्ल मार्क्स याने एका नव्या चातुर्वर्ण्याची प्रस्थापना करून ठेवली आहे. अमक्या जातीचे अमके गुण ही कल्पना जुन्या चातुर्वर्ण्याच्या बुडाशी होती तर अमक्या आर्थिक स्थितीचे अमके गुण ही कल्पना नव्या चातुर्वर्ण्याच्या बुडाशी आहे. आणि जुनी चातुर्वर्ण्य व्यवस्था जितकी समाजाला घातक ठरली तितकीच ही नवी ठरणार आहे- नव्हे ठरली आहे. ब्राह्मण-क्षत्रियांच्या अंगी श्रेष्ठ गुण असणारच असे गृहीत धरून त्यांना तसे गुण अंगी नसतानाही समाजाने श्रेष्ठ पदवी दिल्यामुळे समाजाचा घात झाला. आणि त्या ब्राह्मण-क्षत्रियांचाही झाला. ब्राह्मण, विद्वान् असो की अविद्वान् असो, तो वंद्य मानलाच पाहिजे, आणि राजा कसाही असला तरी तो विष्णूचा अंश असतोच, असा मनूचा दंडक आहे. या अत्यंत भ्रामक व अशास्त्रीय आज्ञा समाजाच्या विनाशाला कारण झाल्या हे इतिहास सांगत आहे. गुण नसतानाहि ब्राह्मणाला वंद्य मानल्यामुळे त्या जातीचा अध:पात झाला आणि खालच्या वर्णाच्या ठायी गुण असूनही त्यांना ब्राह्मण-क्षत्रियांची पदवी न मिळाल्यामुळे त्यांची कर्तृत्वशक्ती कुजून गेली. मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्यामुळे हेच घडत आहे. पण जुने शास्त्री पंडित त्या चातुर्वर्ण्याला जसे अंधश्रद्धेने कवटाळून बसले होते तसेच कम्युनिस्ट शास्त्री-पंडित या नव्या चातुर्वर्ण्याला तशाच भोळ्या अंधश्रद्धेने कवटाळून वसलेले आहेत. ही नवी भोळी अंधश्रद्धा समाजाला तितकीच घातक ठरणार असल्यामुळे मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्याचे येथे विवेचन करावयाचे आहे.
 मोठे भांडवलदार (बूर्झ्वा), लहान व्यापारी- दुकानदार (पेटी बूर्झ्वा), सुशिक्षित बुद्धिजीवी (इंटेलिजेन्सिया) आणि गिरणी कारखान्यांतील कामगार असे मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्यात चार वर्ण आहेत. मार्क्स त्यांना वर्ग म्हणतो. पण त्या वर्गांना त्याने वर्णरूपच दिले असल्यामुळे वर्ण शब्द तितकाच अन्वर्थक आहे. या वर्गाशिवाय मोठा शेतकरी, लहान शेतकरी, शेतमजूर असे जातिपोटजातीप्रमाणेच, अनेक वर्गापवर्ग नव्या चातुर्वर्ण्यात आहेत.
 जुन्या व्यवस्थेत ब्राह्मण हा जसा सर्वश्रेष्ठ होता तसा नव्या व्यवस्थेत कामगार हा सर्वश्रेष्ठ आहे. सर्व वर्गांचा तो अग्रणी आहे. मार्क्सवादात जे अनेक महत्त्वाचे सिद्धान्त आहेत त्यांत, सध्याच्या युगात जी क्रांती व्हायची तिचा नेता कामगारच असणार, कामगारांच्या नेतृत्वाखालीच ती क्रांती