पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
वैयक्तिक व सामाजिक

जे प्रसिद्ध आहेत त्यांनी हे मत सोडलेले तर नाहीच. पण त्याला त्यांनी मुरडही घातलेली नाही. म्हणून त्या मताचे परीक्षण करणे अवश्य आहे.
 'कामगार' हा शब्द प्रॉलिटरियट किंवा वर्किंग क्लास या अर्थी मराठीत रूढ झालेला आहे. शहरातला गिरण्या- कारखान्यातला मजूर असा मार्क्सवादाला त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. खाणी, गिरण्या, कारखाने, त्यांतील सर्व यंत्रसंभार ही सर्व धननिर्मितीची साधने होत. यांचे मालक ते भांडवलदार. आणि स्वतःच्या शरीरशक्तीवाचून ज्याच्याजवळ अर्थोत्पादनाचे, उपजीविकेचे कसलेही साधन नाही तो कामगार. शहरातला लहानसहान कारागीर व खेड्यातील शेतकरी हा कष्ट करूनच पोट भरीत असतो. तोही गरीबच असतो. पण कामगारापेक्षा तो निराळा आहे. अरी, रापी, कुऱ्हाड, करणी, चाक, गाढव, गाडा, बैल अशी काही तरी मालकीची साधने शहरातल्या इतर श्रमजीवी वर्गाजवळ असतात. आणि नांगर, कुळव, कासरे, अवजारे, बैलजोडी व थोडी जमीन अशी धनसाधने खेड्यातल्या शेतकऱ्याजवळ असतात. कामगाराजवळ यातले काहीही नसते. किंवा असे कोणतेही अर्थसाधन ज्याला नाही त्यालाच मार्क्स कामगार म्हणतो. क्रांतीचा नेता, आघाडीचा लढवय्या तो तोच. कसल्याहि प्रकारची जिंदगी अशी त्याच्याजवळ नसते. जगातल्या सर्व जिंदगीहीनांच्या मूर्धस्थानी तो असतो. आणि असा हा पूर्ण निर्धन कामगार मार्क्समताने क्रांतीचा नेता असतो.
 कम्युनिस्टांचे पुढारी भाई डांगे यांनी भारताच्या प्राचीन इतिहासाची मीमांसा एका पुस्तकात केली आहे. त्यात प्रारंभी रानडे, राजवाडे, टिळक इ. महाराष्ट्रीय पंडितांनी राष्ट्राभिमानाची जी प्रेरणा भारताला दिली व त्यासाठी जी इतिहास-मीमांसा केली तिचा विचार केला आहे. इंग्रजांविरुद्ध लढण्यास त्यांनी येथल्या जाती-जमातींना सर्व वर्गांना- श्रीमंतांना, गरिबांना, कामगारांना, शेतकऱ्यांना आवाहन केले होते. यावर डांगे म्हणतात की अशा रीतीने हे सर्वच वर्ग क्रांतिकारक आहेत असे या पंडितांनी मानले, हा त्यांचा भ्रम होता. पुढच्या घडामोडीत या भ्रमाचा निरास होऊ लागला. आणि पुढच्या काळात शेतकरी व कामगार हे खरे क्रांतिकारक वगापुढे आले. बाकीच्या वर्गांनी लढा दिला असेल. पण तो स्वार्थासाठी; राष्ट्रासाठी नव्हे.