पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८३
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

दारांनी दीड दोन हजार होन घ्यावे.' (सभासद बखर) सध्या असेच चालू आहे. अप्रत्यक्ष करांची सरकार भरमसाट वाढ करणार आहे. अजून करण्यास खूप अवसर आहे अशी त्याची श्रद्धा आहे, याचा हाच अर्थ होतो. तो कर वसूल करणारे मध्यस्थ हे व्यापारी, उद्योगपती, कारखानदार हे असतात. सरकारने एक पैसा कर ठेवला तर ते चार आणे घेतात. मग सरकार मध्ये पडून दोन आण्यांवर तडजोड करून प्रजेचे कल्याण साधते. पण त्यामुळे गरीब रयतेस वाटते की, 'इंग्रेज मुलकात आले त्याहूनहि हे अधिक.'
 आपल्याला परकीय आक्रमणाचे स्वरूप ओळखण्याचे सामर्थ्य नाही. आक्रमण येणार आहे याची आपल्याला आगाऊ कल्पना येऊ शकत नाही. रामदेवरावांची देवगिरी संपत्तीने तुडुंब भरलेली होती. सातशे मैलांवरून अल्लाउद्दीन खिलजीला तिचा वास आला. आणि तो ती लुटण्यासाठी निघाला. पण रामदेवरावाला मात्र ही टोळधाड किल्ल्याच्या तटावर येऊन धडकेपर्यंत तिची कल्पना नव्हती. आजही चीन आक्रमण करील असे आपल्याला वाटले नव्हते. आक्रमण झाल्यावरही ते क्षुद्र आहे अशीच आपली श्रद्धा होती. त्याचे स्वरूप अजूनही आपण ओळखू शकलेलो नाही. दर वेळी आपण अजून विस्मितच होत आहो. जुने कागदपत्र काढून त्यांच्या आधाराने, पुराव्याने, प्रमाणाने, हिंदभूमीवरचा आपला हक्क आपण शाबीत करताच चीनला माघार घ्यावी लागेल याविषयी आपल्याला शंका नाही.
 धर्मनिष्ठा व राष्ट्रनिष्ठा या शक्ती आपण आज राजकारणातून काढूनच टाकल्या आहेत. चिनी आक्रमक आले आहेत ते मागल्या मोगल शिपायांप्रमाणे पिसाट संहारशक्तीने प्रेरित झालेले आहेत. आक्रमण करणे, लूट, जाळ पोळ, अत्याचार हा त्यांचा राष्ट्रधर्म आहे. त्यांच्यापुढे आम्ही भारतीय पंचशील, अहिंसा, सत्य, विश्वशांती ही श्रेष्ठ धर्मतत्त्वे उभी करीत आहोत. आक्रमक राष्ट्रधर्माला तितक्याच कडव्या, जहरी, जळत्या राष्ट्रधर्माने उत्तर दिले पाहिजे हे आपल्या नेत्यांना मान्यच नाही. आमचे राज्य निधर्मी आहे, आम्ही मानवतेचे पुजारी आहो यातच ते समाधान आणि भूषण मानीत आहेत. त्यामुळे मागल्याप्रमाणेच भारतावर आक्रमणे होऊ लागली आहेत. पाकिस्तानचे आक्रमण आले, चीनचे आले. त्यांच्यापुढेच नव्हे तर नागांच्यापुढेसुद्धा आपण हतबल ठरणार असा रंग दिसत आहे. भारतावर विमाने तर कोणाकोणाची