पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
वैयक्तिक व सामाजिक

प्रताप भूमंडळी ! शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणें, कैसी असे' असे म्हटले ते किती यथार्थ आहे ते आपणांस सहज कळून येईल आणि स्वामींचा तो उपदेश आजही हृदयावर कोरून ठेवून आजही आपण अहोरात्र 'शिवरायाचे रूप' आठवणे किती अवश्य आहे हे ध्यानी येईल. आजही आपला ओढा अदृष्टफलधर्माकडे कसा आहे ते महशूर आहे. राष्ट्रविकास योजनेसाठी कोटी रुपये खर्चावयाचे ठरल्यावर सरकारी अधिकारी वर्षअखेर तेवढे खर्च झाले की नाही एवढेच पाहतात आणि ते झाले की धन्यता मानतात. यामुळे समाजाला प्रत्यक्ष उपयोग किती झाला, शेतीचे पीक किती वाढले, ग्रामजनांच्या काही सुखसोयी झाल्या की नाही, याविषयी ते सर्वथा उदासीन असतात. नियोजन सुरू होऊन दहा वर्षे झाली. पण त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात जी वाढ झाली ती कोठे गेली, तिचा उपयोग काय झाला, हे पाहण्याचे इतक्या वर्षांत कोणाला सुचलेच नाही. कारण फलाविषयी आपण बेफिकीर आहो. भूदान यज्ञवाले तर आता पूर्ण अदृष्टफलधर्मवादी झाले आहेत. जमिनीच्या वाटणीचे परिणाम काय झाले, जमिनीचा कस सुधारला काय, शेत-मजुरांना किती जमिनी मिळाल्या, ग्रामीण बेकारी हटली काय, हे प्रश्न त्यांचे नव्हतच. त्यांना एकामागोमाग एक नवीन स्वर्गीय कल्पना सुचत आहेत. भूदान, संपत्तिदान, श्रमदान, जीवनदान (जीवनदान दोन प्रकारचे एक म्हणजे लोकांनी चळवळीसाठी जीवनदान करावयाचे आणि दुसरे म्हणजे आचार्य विनोबांनी डाकू, खुनी, लुटारू यांना फासावरून उतरून त्यांना जीवनदान द्यावयाचे), सर्व प्रकारचे दान ! हे सर्व कार्य लवकरच हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणीतील दानखंडासारखे होणार असा रंग दिसतो. शिक्षणाच्या, दारूबंदीच्या, सर्वच बाबतीत हेच चालले आहे. फलाची आसक्ती आपल्याला नाही. ते सर्व परलोकात मिळेल अशी आपली श्रद्धा आहे.
 दुसरे असे की, त्या मागल्या काळाप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात मनसबदारी, वतनदारी, मिरासदारी निर्माण झाली आहे, आणि आपल्या सत्ताधीशांनी जनतेला या मिरासदारांच्या स्वाधीन केले आहे. कापडवाले, कागदवाले, साखरवाले, रॉकेलवाले यांना सरकार एक आणा भाववाढ करण्यास परवानगी देते. ते एक रुपया वाढवितात. मोगली सुलतानांचे मिरासदार हेच करीत. 'जे गावी दोनशे तीनशे होन खंडणी सरकारास द्यावी, ते गावी मिरास-