पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८१
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

व राज्यवृद्धी करणे म्हणोन पार पडला' असा उपदेश प्रत्यक्ष जिजामाताच महाराजांना करीत होती. यवन सेवा हा अधर्म होय आणि स्वधर्म व राज्यवृद्धी ही अभिन्न आहेत हा या पत्रातील आशय उघड आहे. मुसलमानी आक्रमणामागे वर सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या लुटीच्या, जाळपोळीच्या, कत्तलीच्या, विध्वंसाच्याही मागे त्यांची जळती धर्मभावना त्यांच्या सुलतानांनी नित्य उभी ठेवली होती, या महाशक्तीचे स्वरूप महाराजांनी जाणले आणि धर्म म्हणजे मोक्ष, धर्म म्हणजे परलोक, धर्म म्हणजे मायावाद, निवृत्ति, धर्म म्हणजे स्वातंत्र्यधनाविषयीची उदासीनता या अनर्थकारक कल्पनेचे निर्मूलन करून टाकले. अंध, जड धर्माच्या जनमतावरच्या शृंखला याप्रमाणे तुटून पडताच जनतेच्या सुप्त शक्ती जागृत झाल्या, नव्या आकांक्षा व नवी सामर्थ्ये तिच्या ठायी उदित झाली आणि त्यामुळे मुस्लिम आक्रमण तोडून काढून स्वराज्याची व पुढे साम्राज्याची स्थापना करणे ही दुर्घट वाटणारी गोष्ट मराठ्यांना सहज साध्य झाली. मराठ्यांच्या पूर्वी मुस्लिम आक्रमणाला तोंड देण्याचे प्रयत्न राजपूत व कर्नाटकी यांनी केले पण त्यांनी अशी धार्मिक व सामाजिक क्रांती करून जनतेची शक्ती आपल्या पाठीशी उभी करण्याचे प्रयत्न मुळीच केले नाहीत. म्हणून त्यांनी काही काळ अत्यंत गौरवास्पद असे जरी यश मिळविले तरी अखिल हिंदुस्थान यवनमुक्त करण्यात त्यांना यश आले नाही; इतकेच नव्हे तर आपले स्वतःचे स्वातंत्र्य व प्रतिष्ठाही टिकविता आली नाही. मोठी कार्ये साधावयाची तर समाजात मोठी निष्ठा, मोठे संघटन-तत्त्व दृढमूल करणे अवश्य असते, हे त्या पराक्रमी लोकांनी जाणले नाही. शिवछत्रपतींनी हे जाणले होते. एके प्रसंगी प्रत्यक्ष शहाजी राजे याविषयी बोलताना त्यांनी हा विचार व्यक्त केला आहे. 'आमुचे वडील शहाजी राजे परमशूर आणि योगवंतहि. त्यानी केली कामे ही निर्मल मने करून केली; परंतु त्यात थोडा भाव सुचतो. तो असा की, ते प्रथम निजामशाहीच्या संगतीत होते. ते अल्ली अदलशहाचे बोलावण्यावरून त्याच्याकडे गेले. परतून निजामशहांनी बलाविताच त्याकडे गेले. पुनः अल्ली यदलशहाकडेहि आले. ऐशा दोन तीन येरझारा जाल्या. थोर मनुष्यांनी येकाची संगति धरिल्यावरी त्याशी बिडताच नये, हे तो नीति प्रसिद्ध आहे.'
 छत्रपतींनी जी क्रांती केली ती आणि तिची फले पाहता समर्थांनी 'शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा साक्षेप, शिवरायाचा आठवावा
 वै. सा. ... ६