पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
वैयक्तिक व सामाजिक

होते त्या समाजातून हजारो कर्ते पुरुष निर्माण झाले व प्रारंभापासून या तरुण राजाच्या पाठीशी उभे राहून त्यांनी स्वराज्याच्या शपथा घेतल्या. मोगली सत्तेच्या अस्मानी सुलतानीला पराभूत करण्यासाठी महाराजांनी तितकीच समर्थ अशी शक्ती निर्माण केली तिचे रहस्य हे आहे. (छत्रपतींनी केलेल्या या क्रांतीचे विस्तृत आणि अतिशय सुगम वर्णन श्री. लालजी पेंडसे यांनी आपल्या 'धर्म की क्रांति' या पुस्तकात केले आहे.)
 श्रीशिवछत्रपतींनी फार मोठी धर्मक्रांती केली असे आरंभापासून वर सांगितले आहे, त्याचा अर्थ आता स्पष्ट होईल. महाराजांनी कलियुगकल्पना नष्ट केली, हरिहर हिंदूंना पाठमोरे झाले आहेत, आपले देवच मुस्लीमांना वश आहेत हा घातकी समज जनमनातून समूळ काढून टाकला. त्याचप्रमाणे अदृष्ट फलप्रधान धर्म उच्छिन्न करून टाकून पतितांची शुद्धी, परदेशगमन, समुद्र- प्रवास हे नवे धर्माचार सुरू केले. आरमार बांधून स्वतः वेदनूरवर समुद्रमार्गे स्वारी करून शतकाशतकांची सिंधुबंदी रद्द केली. तिच्यामुळे समाजाचा घात होतो हे त्यांनी प्रत्यक्ष लोकव्यवहार पाहून जाणले. हिंदूंचे अवलोकन करून निर्णय काढण्याचे सामर्थ्यच शास्त्रीपंडितांच्या अदृष्टफल-धर्माने नष्ट करून टाकले होते. महाराजांनी ते तत्त्वच झुगारून दिले. ब्राह्मण. मराठे हे जन्मतःच श्रेष्ठ या कल्पना छत्रपतींनी हेटाळून टाकल्या. जो लढेल तो क्षत्रिय, जो विद्वान् असेल तो ब्राह्मण ही कल्पना त्यांनी आदरिली. त्यामुळेच मागे सांगितल्याप्रमाणे सर्व जातीजमातीतून कर्तृत्व फुलारून वर आले. जिवाजी विनायक सुभेदार यांना लिहिलेल्या पत्रात, 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो ? ऐशा चाकरास ठाकठीक केले पाहिजे' असे महाराजांनी बजाविले; त्याचप्रमाणे 'ज्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल त्या मराठीयाची तो इज्जत वाचणार नाही' असे कडक धोरण त्यांनी ठेवले होते. इतकेच नव्हे तर चिंचवडच्या देवांना सुद्धा मिठावरचा कर घेण्याबद्दल जरब बसविण्यास छत्रपतींनी कमी केले नाही. धर्माचा व राजकारणाचा, स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा संबंध जोडून देणे व धर्मनिष्ठेची शक्ती स्वातंत्र्याच्या कार्याच्या मागे उभी करणे ही तर सर्वात मोठी क्रांती होय. 'बाजी घोरपडे मुधोळकर याणी स्वधर्मसाधनता सोडून यवन दुष्ट तुरुक याचे कृत्यास अनुकूल झाले. त्यामुळे जो प्रसंग गुजरला तो श्री तुमचा मनोरथ सिद्धीस नेणे व स्वधर्म