पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७९
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

पुण्याला येताच ही पद्धत सुरू केली. प्रतिवर्षी जमिनीची पाहणी करून उत्पन्नाप्रमाणे वसूल घेण्याची पद्धत त्यांनी रूढ केली. पीक बुडाले असेल तर दादोजी वसूल घेत नसत. त्यामुळे लोक भराभर लागवड करू लागले. केल्या कष्टाचे फळ मिळेल हे कुणब्याला दिसू लागाताच त्याने पुण्याभोवती दहा वर्षात नंदनवन निर्माण केले. हे करीत असताना जे वतनदार आडवे येत त्यांना रयतेच्या साह्याने दादोजींनी भरडून काढले. शिवछत्रपति बालवयांत हा अद्भुत प्रयोग, ही अलौकिक क्रांती पहात होते. ती पहात असताना हा शेतकरी, हा कुणबी, म्हणजे राष्ट्राचा खरा कणा आहे हे त्यांच्या ध्यानी आले आणि हाती सूत्रे येताच गुरुजींच्याच पावलावर पावले टाकून, सर्व मनसबदारी, सर्व मक्तेबाजी नष्ट करून 'लोक' ही अमोघ शक्ती हिंदवी स्वराज्याच्यासाठी त्यांनी सिद्ध केली. महाराजांची जी काही पत्रे प्रसिद्ध झाली आहेत त्यातून या कुणब्याची ते अहोरात्र कशी चिंता वाहात असत ते स्पष्ट दिसून येते. लष्कराचे लोक चढेल असतात, ते कुणब्यापासून भाजी, पाला, गवत, फाटी घेतात आणि पैसे देत नाहीत, हे जाणून महाराजांनी सक्त ताकीद दिलेली असे की, प्रत्येक वस्तु विकतच घेतली पाहिजे. नाहीतर काय अनर्थ झाला असता ? 'गरीब कुणबी आहेत त्यास असे होईल की मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही!' त्या सुलतानी सत्तेहून हे राज्य निराळे आहे, येथे केल्या कष्टाचे चीज होते, राजा प्रजेच्या योगक्षेमाची काळजी वाहतो, हे रयतेच्या निदर्शनास आले तरच तिला हिंदवी स्वराज्याचा अर्थ कळेल आणि मग ती त्यासाठी झुंज घेण्यास सिद्ध होईल हे महाराजांनी जाणले आणि सरंजामशाहीचा, वतनदारीचा नाश हे आपले पहिले उद्दिष्ट ठेवून अल्पावधीतच ते सिद्धीस नेले. छत्रपतींना घाटगे, खंडागळे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, मोरे, सावंत, सुर्वे, खोपडे, कोकणचे देसाई, मावळचे देशमुख यांनी कडवा विरोध केला तो या कारणासाठी. ते सर्व पातशाही सरदार होते आणि वर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जहागिरी म्हणजे लहान लहान स्वतंत्र राज्ये होती. तेथे त्यांची सत्ता अनियंत्रित होती. ही सत्ता व तिच्यापासून प्राप्त होणारे धनैश्वर्य याला ते स्वराज्यांत मुकणार होते. छत्रपतींच्या उज्ज्वल चारित्र्याचा परिणाम होऊन त्यांच्यातील काही मिरासदार महाराजांना वश झाले. पण बव्हंशी मिरासदारांनी छत्रपतींना शेवटपर्यंत विरोधच केला. पण या क्रांतीमुळे ज्याचे कल्याण होणार