पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
वैयक्तिक व सामाजिक

भ्रष्टतेचे सविस्तर विवेचन 'आपल्या लोकशाहीवरील नवे संकट' या लेखात केले आहे. आपल्याकडच्या या 'मवाली राजकारणा'चा विचार करताना भारतातील सत्ताधारी पक्षातील लोकांचीच वक्तव्ये मी आधारासाठी दिलेली आहेत. या सर्व वर्णनावरून आपण कोणत्या ज्वालामुखीवर उभे आहो याची कल्पना वाचकांना येईल असे वाटते. अमेरिकेतही हीच परिस्थिती आहे. पण तेथल्या लोकांच्या कर्तृत्वाची दुसरीही बाजू आपण अभ्यासिली पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्य, समता, लोकसत्ता, यांचा अमेरिका हा आजच्या जगातला एकमेव आधारस्तंभ आहे. या महनीय तत्त्वांचे जगातल्या प्रत्येक देशात संरक्षण करण्याची जिम्मेदारी आपल्या शिरावर आहे, अशीच अमेरिकनांची धारणा आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी ते काय काय प्रयत्न करीत आहेत, कोणत्या योजना त्यांनी आखल्या आहेत, त्याची माहिती अमेरिकेविषयीच्या दुसऱ्या लेखात दिली आहे. अमेरिका हे भांडवलशाही राष्ट्र आहे. आणि भांडवलशाही म्हणजे उन्मत्त, स्वार्थी, मदांध, आक्रमक, युद्धपिपासु सत्ता हे समीकरण आपल्या डोक्यांत बसून गेले आहे. हे समीकरण आणखी दृढ करण्याचा कम्युनिस्ट अखंड प्रयत्न करीत असतात. भारत सरकार अमेरिकेशी स्नेहसंबंध ठेवते म्हणून कम्युनिस्ट आपल्या शास्त्यांना, अमेरिकेचे लाचार गुलाम, त्यांचे बूटपुश्ये अशा चीन- रशियातून लिहून आलेल्या शिव्या हुकमाप्रमाणे देत असतात. त्यामुळे व अमेरिकेचा इतिहास आपणांस पटत नसल्यामुळे त्या थोर राष्ट्राविषयी आपल्या मनात फार विकृत समज होण्याचा संभव आहे. त्यामुळे आपलीच अतिशय हानी होईल. आपले शत्रु-मित्र आपल्याला ओळखता येऊ नयेत ही फार नामुष्कीची गोष्ट आहे. अमेरिकेच्या इतिहासाचा अभ्यास आपल्या विद्यालयातून केला जावा अशी सूचना मी केली आहे.
 'आधी समाजकारण की आधी राजकारण' हा वाद महाराष्ट्रांत एके काळी फार चिघळला होता. कमीत कमी चाळीस वर्षे या वादाने महाराष्ट्राचे रक्त आटवले आहे. वास्तविक ही दोन्ही कारणे परस्परपोषक आहेत. एकावाचून दुसरे पंगूच राहणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या विचाराने व प्रत्यक्ष कृतीने हा विचार महाराष्ट्राच्या पुढे मूर्त केला आहे. राजकारण ही तरवार असली तर समाजकारण ही ढाल आहे, असे त्यांचे मत आहे