पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना

व्यक्तीच्या कोणत्याही कृत्याला ती स्वतः जबाबदार नसून तिच्यावर होणारे संस्कार, तिची परिस्थिती ही जबाबदार आहेत असा सिद्धान्त मांडला आहे. त्यावर श्रद्धा ठेविल्यामुळे आपल्या समाजाचा कसा अधःपात होत आहे याचे विवेचन दुसऱ्या लेखात केले आहे. 'शिवछत्रपतींचे क्रांति- कार्य' या लेखाचे विद्यार्थ्यांनी पुनःपुन्हा वाचन, मनन करावे अशी माझी त्यांना विनंती आहे. छत्रपतींनी स्वराज्यस्थापना केली एवढेच त्यांना माहीत असते. पण हे कार्य साधताना त्यांनी धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सर्व प्रकारची क्रान्ती येथे कशी केली याची त्यांना कल्पना नसते. त्या क्रान्तीवाचून छत्रपतींना स्वराज्यस्थापनेत यश आलेच नसते असे म्हणण्याइतके तिचे महत्त्व आहे. भारताच्या प्राचीन इतिहासातून शक्य तेवढे पुरावे, प्रमाणे देऊन या क्रान्तिकार्याचे स्वरूप या निबंधात स्पष्ट केले आहे.
 डग्लस जे हा एक इंग्लिश समाजवादी पंडित आहे. त्याने 'सोशॅलिझम् इन् दि न्यू सोसायटी' हा ग्रंथ नुकताच (१९६२) लिहिला आहे. समाजवादाची मूलभूत तत्त्वे मार्क्सच्या आधीच्या पंडितांनी सांगितली होती. ती समाजाला मान्य होऊन त्यामुळे त्याची प्रगतीही होत होती. त्या तत्त्वांना योग्य अवसर मिळाला असता तर गेल्या आणखी शंभर वर्षांत बरीच प्रगती झाली असती. पण दुर्दैवाने मध्येच मार्क्सचा अवतार झाला व त्याने अत्यंत अशास्त्रीय सिद्धान्त मांडून समाजवादाला अत्यंत विपरीत विकृत रूप दिले, असे या ग्रंथात जे याने विवेचन केले आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मार्क्सवाद वाचण्यास प्रारंभ केला. तेव्हापासूनच माझे हे मत झालेले आहे. 'मार्क्सचे भविष्यपुराण' हा विषय अनेक वर्षांपूर्वी मी व्याख्यानांतून मांडला होता. पुढे अधिक अभ्यासाने मार्क्सचा 'ऐतिहासिक जडवाद' व त्याचा वर्गविग्रहाविषयीचा सिद्धान्त हे अत्यंत अशास्त्रीय व भ्रामक आहेत, हे मनाशी निश्चित झाले. 'मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य' व 'मार्क्सचे भविष्यपुराण' या निबंधांत मार्क्सवादातील अशास्त्रीयता मी स्पष्ट करून दाखविली आहे.
 भारतामध्ये सध्या लाचलुचपत, वशिलेबाजी, काळाबाजार, भ्रष्टता गुंडगिरी कोणत्या थराला गेली आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळे आपल्या लोकशाहीचा पायाच ढासळत आहे. ही भ्रष्टता हे लोकशाहीवरचे केवढे ंकट आहे, याची कल्पना यावी म्हणून अमेरिकेतील असल्याच 'राजकारणी'