पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
वैयक्तिक व सामाजिक

तरी जावो. प्रयत्न करावा.' असेच महाराजांनी ठरविले. 'पुरुषप्रयत्न बलवत्तर, दैव पंगू आहे, यास्तव प्रयत्ने अलबल करावे, त्यास दैव जसजसे सहाय होईल तसतसे अधिक करीत जावे. देव परिणामास नेणार समर्थ आहे.' अशी छत्रपतींची श्रद्धा होती. देव आपल्याला साह्य करणार नाही, परमेश्वरानेच पाठ फिरविली आहे, अशी अत्यंत घातक श्रद्धा हिंदू मनात रुजली होती. महाराजांनी प्रथम ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. थोर पुरुषांचे हेच वैशिष्ट्य आहे. ते प्रथम धर्मक्रांति करतात. लोकांच्या श्रद्धा, लोकांचे तत्त्वज्ञान यात प्रथम परिवर्तन घडवितात. कारण सामर्थ्य तेथे आहे हे त्यांना कळलेले असते. परमेश्वर आपणास प्रतिकूल आहे ही अमंगल कल्पना नाहीशी करण्याचा महाराजांचा प्रयत्न जागोजाग दिसून येतो. दादाजी नरस प्रभूला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, 'हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. श्रीरोहिरेश्वराने आम्हास यश दिले. तोच सर्व मनोरथ, हिंदवी स्वराज्य करून, पुरविणार आहे.' प्रारंभीच्या दिवसांत स्वतःस राजे म्हणविण्याचा अधिकार कोणास आहे हा वाद निघाला असता आम्हास पादशहाने राजे किताब मेहेरबान होऊन दिधले.' असे रावराजे मोरे यांनी महाराजांना लिहिले. महाराजांची श्रद्धा अशी की, 'आम्हास श्रीशंभूने राज्य दिधले आहे.'
 कलियुग कल्पनेप्रमाणेच हिंदुधर्मीयात इतरहि अनेक आत्मघातकी कल्पना शिरल्या होत्या. 'कलावाद्यन्तयोः स्थितिः' आणि 'नदान्तं क्षत्रियकुलम् ।' ही त्यापैकीच विपरीत कल्पना होय. या वचनांमुळे कलियुगात आदि- ब्राह्मण व अन्त-शूद्र येवढेच वर्ण शिल्लक आहेत, पुराणातील नन्दवंशाबरोबरच क्षत्रियकुले- एकंदर क्षत्रियवर्णच नष्ट झाला, त्यामुळे, हिंदूंमध्ये राजा होण्यास कोणीच पात्र नाही, असा समज सर्वत्र रूढ होऊ लागला. शब्दप्रामाण्यबुद्धीने समाजाचा केवढा नाश होतो हे यावरून दिसेल. ज्यांनी ही वचने रूढ केली त्यांनी क्षणभर समाजाचे प्रत्यक्ष अवलोकन केले असते तरी यातील वेडगळपणा त्यांच्या ध्यानी आला असता. नन्दांच्यानंतर शातवाहन, वाकाटक, गुप्त, राष्ट्रकूट, चालुक्य, गोहिलोत, ही केवढाली क्षत्रियकुले पराक्रम करीत होती. राज्ये स्थापित होती. अश्वमेध करून सार्वभौमत्वाची ग्वाही फिरवीत होती. नंदपूर्व क्षत्रियांपेक्षा यांचे पराक्रम अणुमात्र कमी नव्हते. पण समाजातील घडामोडी पाहून काही निर्णय करावा ही ऐपतच येथील