पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७१
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

तत्त्ववेत्त्यात राहिली नव्हती. ही वचने ब्राह्मणांनी लिहिली आणि त्यापेक्षाहि वाईट म्हणजे क्षत्रियांनी त्यावर श्रद्धा ठेवली. वास्तविक भारतात तत्त्वज्ञान व धर्म सांगण्याचा क्षत्रियांचा अधिकार ब्राह्मणांइतकाच मोठा आहे. श्रीकृष्ण भीष्म, गौतमबुद्ध, महावीर, मनु हे सर्व क्षत्रिय होते. उपनिषदकार ऋषींमध्ये अनेक क्षत्रिय होते. मध्यंतरीच्या काळात ललितादित्य, भोज, भर्तृहरी, श्रीहर्ष, मुंज हे क्षत्रिय राजे चांगले विद्वान् होते, शास्त्रज्ञ होते. पण खरे जीवन पाहून प्रत्यक्ष सामाजिक प्रपंच पाहून, समाजाच्या उत्कर्षापकर्षाचे चिंतन करून धर्मप्रवचन करण्याची क्षत्रियांची परंपराहि पुढे नष्ट झाली. आणि सर्व महापराक्रमी क्षत्रिय वीर परक्यांची राज्ये वाढवीत बसले, इस्लामी साम्राज्यांचा विस्तार करीत राहिले. महंमदशहा सूर यांचा सेनापति हिमू, अकबराचे सेनापति भगवानदास व मानसिंग, औरंगजेबाचे सेनापति मिर्झाराजे जयसिंग व जसवंतसिंग, सवाई जयसिंग, शहाजी, मुरार जगदेव हे सर्व महापराक्रमी सरदार होते. मोगल, अफगाण, तुर्क यांच्या मोठ्या मोठ्या सेनांना यांनी धूळ चारिली आहे. इस्लामी सुलतानाच्या राज्याचा विस्तार मध्य आशियापासून दक्षिणेत रामेश्वरापर्यंत करण्यास यांचेच प्रयत्न कारणीभूत झाले आहेत. पण या पराक्रमी पुरुषांनी स्वतःचे राज्य स्थापिले नाही, हिंदवी स्वराज्याचे स्फुरणच त्यांना झाले नाही. या यवनसेवेत धर्महानि नाही, हिंदुधर्म कलियुगात क्षयासच जाणार, स्वतंत्र राज्याचा अधिकार आपणास नाही असल्या कल्पनांनी या कर्त्या पुरुषांना स्वत्वहीन करून टाकले होते. मुसलमानाप्रमाणे धर्म व राजकारण यांची सांगड क्षत्रियांनी घातली असती, स्वराज्य, साम्राज्य, शत्रूंचा निःपात, आक्रमकांची कत्तल, ही धर्मकृत्येच आहेत, अशी श्रद्धा त्यांनी जोपासली असती तर त्यांना स्वराज्य स्थापता आले असते. ते शिवछत्रपतींच्या इतकेच शूर होते, रणनिपुण होते. पण छत्रपतींनी ती श्रद्धा जोपासली आणि 'नदान्तं क्षत्रियकुलम्' 'कलावाद्यन्तयोः स्थितिः' या महामूर्ख वचनांना हेटाळून क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपति' अशी पदवी धारण केली. आणि स्वतःचा शक सुरू केला. दुर्दैवाने त्या वेळच्या मोहिते, घोरपडे, मोरे, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर आदि सरदारांना ही कल्पना झेपली नाही. या सिंहासनाधीश्वराला ते कायम विरोध करीत राहिले. त्याच्याशी लढत राहिले. प्रत्यक्ष छत्रपतींचा भाऊ आणि त्यांचा युवराज यांनाहि या धर्म-