पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

स्वरूप नीट आकळण्यास शिवपूर्वं धर्मवेत्त्यांनी धर्माला अत्यंत घातक रूप कसे दिले होते ते पाहणे अवश्य आहे.
 यो यच्छ्रद्धः स एव सः । असें भगवद्वचन आहे. जशी ज्याची श्रद्धा तसे त्याचे भवितव्य असा त्याचा अर्थ आहे. समाज जो धर्म किंवा जे तत्त्वज्ञान स्वीकारतो त्याप्रमाणे त्याचे नशीब ठरत असते. भारतीयांनी या काळात कलियुगाचे तत्त्वज्ञान स्वीकारले होते. सत्ययुगात उन्नती होत जाते आणि कलियुगात अधःपातच व्हावयाचा, अशी श्रद्धा त्या वेळी समाजमनात घर करून राहिली होती आणि त्या वेळचे धर्मप्रवक्ते ती दृढमूल करून टाकीत होते. त्यामुळे मुसलमानी आक्रमणाला तोंड द्यावे, ते मोडून काढावे ही उभारी जनमनातून नाहीशी होत चालली होती. कारण आता म्लेंच्छांचाच जय व्हावयाचा, त्यांचेच राज्य चालावयाचे, आपल्या प्रयत्नाला यश येणार नाही हीच हीन भावना लोकांच्या मनात रुतून बसली होती. महाराष्ट्रातून हिंदूराज्ये नष्ट झाली याविषयी महिकावतीची बखर लिहिणारा लेखक म्हणतो, 'कलियुगात असा प्रकार होणार अशी भाक लक्ष्मीनारायणाने कलीस दिली होती. ती शके १२७० त (इ. स. १३४८) खरी ठरली. हरिहर गुप्त झाले. ऋषि बदरिकाश्रमी गेले, वसिष्ठहि गेले. सूर्यवंशी, चंद्रवंशी क्षत्रिय यांची शस्त्रविद्या लुप्त झाली.' विश्वाचें त्राते जे देव आणि ऋषि यांनीच पाठ फिरविली आणि हिंदूंना कलीच्या स्वाधीन केले ! मग आपल्याला जय मिळेल असा आत्मविश्वास त्यांनी कशाच्या बळावर धरावा ? मल्हारराव रामराव चिटणीस यांनी शिवाजीमहाराजांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र लिहिले आहे. त्यात कलियुगकल्पना छत्रपतींनी कशी हेटाळून टाकिली त्याचे वर्णन केले आहे. महाराजांनी विचार केला, 'आपण हिंदु, सर्व दक्षण देश म्लेंच्छांनी ग्रासिला. धर्म बुडविला. हा रक्षणार्थं प्राणहि वेचून धर्म रक्षू व आपले पराक्रमाने नवीन दौलत संपादूं. नवे साधावे हे या कुलात जन्मल्याचे सार्थक' असे ठरवून महाराजांनी दादोजी कोंडदेव यास सल्ला विचारला. त्यांनी उत्तर केले, 'आपण म्हणता परंतु याचा शेवट लागणे परम दुर्घट आहे. साहेब मनात आणतात याचा विचार म्हणता तरी हे युग विपरीत. तेव्हा दिवसें- दिवस धर्म क्षयास जाणार, तेव्हा हे घडणे दुरासाद.' गुरुजींचा असा नाउमेदकारक सल्ला मिळाला तरी 'धर्म वृद्धिंगत करण्यासाठी प्राण दौलत गेली