पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वैयक्तिक व सामाजिक

करावे, त्याची किती हेळसांड करावी याविषयी समाज जे धोरण ठरवील त्यावर त्याचा उत्कर्षापकर्ष बव्हंशी अवलंबून असतो. आपला धर्म कोणता, समाजधर्म कोणता हे ठरविताना मानवाला स्वतःच्या बुद्धीने निर्णय करण्याचा अधिकार आहे की नाही, का त्याने सर्वस्वी श्रुतिस्मृतींना माथा घेऊनच वर्तले पाहिजे, हा प्रश्न तर समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत मूलगामी आहे. बुद्धीची अवहेलना करून शब्दप्रामाण्याच्या आहारी गेल्यामुळेच भारताचे सर्व कर्तृत्व सात-आठशे वर्षे कुजून गेले होते. नव्या जगात समाजवादी समाजरचनेचा महिमा फार मानला जातो. पण अर्थसाधने शासनांच्या ताब्यात गेली की व्यक्तीचे स्वातंत्र्य संपले, व्यक्ती गुलाम झाली, असे मानणारा एक पक्ष आहे. आणि धर्मबंधने व समाजातील जातिबंधने ही व्यक्तीला अंती समाजाला जितकी घातक तितकीच ही अर्थबंधनेही घातक आहेत असे या पक्षाचे मत आहे. म्हणजे याही क्षेत्रात वैयक्तिक आणि सामाजिक यांच्या क्षेत्रांच्या मर्यादा कोणत्या हा प्रश्न उभा राहतो.
 व्यक्ती आणि समाज यांचे परस्परसंबंध काय असावे या प्रश्नातून आतापर्यंतच्या इतिहासात ज्या बहुविध समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यांचा विचार या संग्रहांतील निबंधांत केलेला आहे. वैयक्तिक धर्म व सामाजिक धर्म, वैयक्तिक हित व सामाजिक हित, व्यक्तीचे अधिकार व सामाजिक अधिकार, व्यक्तीचे कर्तृत्व व समाजाचे कर्तृत्व या संबंधीचे चितन हेच या सर्व निबंधांतील सूत्र असल्यामुळे या संग्रहाला 'वैयक्तिक व सामाजिक' असे नाव दिले आहे.
 यातील बहुतेक निबंधांतील चर्चा तात्त्विक असली तरी भारतीय समाजाचा उत्कर्षापकर्ष डोळ्यापुढे ठेवून त्या संबंधातच ती बव्हंशी केलेली आहे. आपल्या समाजात वैयक्तिक पुण्य, वैयक्तिक धर्म यांकडेच सर्वांनी लक्ष दिले व सामाजिक पुण्याकडे लक्ष दिले नाही, 'मुख्य पूजेचे आयतन, प्राणिमात्रा सुखदान' असे संतांनी मांगितले असूनही त्या सुखदानातून आपल्या स्वर्ग- मोक्षलाभाची तरतूद कशी होईल एवढीच दृष्टी आपल्या लोकांनी ठेविली; उलट गेल्या दोनतीनशे वर्षांत पाश्चात्त्य देशांत ख्रिस्ती धर्मांत जे पंथोपपंथ निघाले त्यांचे सर्व लक्ष सामाजिक पुण्याकडेच होते हा विचार पहिल्या निबंधात विशद केला आहे. डॉ. सिग्मंड, फ्रॉईड, वॉटसन, इ. मानसशास्त्रवेत्त्यांनी