पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
वैयक्तिक व सामाजिक

बाकीच्या तीन शहाजाद्यांचा नायनाट करावा असे तिचे कारस्थान चालू होते. आसफखान, खानखानान व महाबतखान हे बादशाहीचे तीन मातबर सरदार यांचे आपसात वैर होते. बादशहाच्या कानी लागून एकाने दुसऱ्यास कैदेत घालावे असे प्रकार नित्य चालत. आसफखानाचा जावई शहाजहान... खुश्रूनंतर त्याने बादशाही तख्तासाठी बंडाळी उभारली. त्याला मधून मधून वरीलपैकी कोणातरी सरदाराचे साह्य असेच. त्याने दक्षिणेत जाताना खुश्रून बरोबर नेऊन तिकडे त्याचा खून करविला. नंतर आग्र्याला असलेला बादशाही खजिनाच लुटावयाचा असे ठरवून त्याने किल्ल्यावर हल्ला केला. यात आसफखान त्याला सामील होता. बादशहा शहाजहानवर चालून आला. दिल्लीनजीक बापलेकांची निकराची लढाई झाली. बादशहा पकडला गेला होता, पण दैववशात् सुटला व शहाजहानला पळून जावे लागले. पुन्हा क्षमा मागावी, पुन्हा बंड करावे असे त्याचे नित्य चाले. महाबतखान या सरदारावर पुढे बादशहाची इतराजी झाली. जहांगीर अत्यंत व्यसनासक्त होता. सर्व कारभार नूरजहान पहात असे. यावर चिडून महाबतखानाने झेलमनजीक बादशाही छावणीवर हल्ला करून त्याला पकडले आणि नूरजहानलाही पकडले. बादशाने बाह्यतः गोडीने वागून आपली कशीतरी सुटका करून घेतली व महाबतखानाच्या नाशाचे उपाय तो योजू लागला. तेवढ्यात त्याचा अंत झाला. खुश्रूचा मुलगा बुलकी याला तख्त द्यावे असे त्याने मरताना सांगून ठेविले होते. त्याप्रमाणे आसफखानाने बुलकीला तख्तावर वसविले. लगेच त्याने चुलता शहर्यार यास पकडून त्याचे डोळे काढले. इकडे शहाजहान काही स्वस्थ बसला नव्हता. मोठ्या फौजा घेऊन तो लाहोरास आला. रजपुत सेनाही त्यास मिळाली, त्यामुळे बुलकीचा पराभव झाला. मग शहाजहानने आपली माणसे पाठवून बुलकी, शहर्यार यासकट राजघराण्यातील सर्व पुरुषांची कत्तल करविली. दानियल, मुराद, पर्वीझ यांचे मुलगे होते. त्यांचीही मुंडकी कापून आणली. अशा रीतीने सर्व निर्वेध झाल्यावर तो तख्तनशीन झाला. त्याच्या उत्तर आयुष्यात त्याच्या मुलांनी हेच केले. मोंगली राज्याचा इतिहास पाहिला तर ही कोणा एका सुलतानाची विकृती नसून त्या रियासतीची प्रकृतीच होती असे दिसेल. (मुसलमानी रियासत - गो. स. सरदेसाई) अशी बेबंदशाही प्रत्येक सुलतानाच्या वेळेस चालू असताना रजपुतांना मोगली