पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

करावयाची, त्यांच्याशी बापाच्या लढाया व्हावयाच्या, ही परंपरा निरपवादपणे अविच्छिन्न चालू होती. मोठमोठे सरदार हे राज्याचे आधारस्तंभ असत. पण ते मोठे झाले की पातशहांना डोईजड वाटत. आणि त्यांचा नाश करून टाकण्याची कारस्थाने नित्य चालू असत. असा कित्येक सरदारांचा नाश दिल्लीच्या बादशहांनी व बहामनी सुलतानांनी केला आहे. त्यात हिंदू सरदारांचा केला तसा मुसलमानांचाही केला. या घातपातांमुळे राज्याचे बळ कितीतरी कमी होत असले पाहिजे. याचा अर्थ असा की, ज्या ज्या कारणामुळे सत्ता दुबळी होईल, समाजात विघटना माजेल, राज्यात दुही उद्भवून त्याला कमजोरी येईल ती सर्व कारणे मुस्लिम आक्रमक सत्तेमध्ये अखंड रुजून राहिली होती. त्यामुळे राजसत्ता अत्यंत कमजोर होऊन जात असे. आणि ती संधि साधून अनेक पराक्रमी पुरुष दिल्ली सहजासहजी खेळता खेळता जिंकून घेत असत. पण ते सर्व मुस्लिम होते. हिंदूंनी असा प्रयत्न केल्याचे सुद्धा इतिहासात नमूद नाही. हे कशाचे लक्षण ? असल्या आक्रमकांनासुद्धा हिंदूंना उलथून टाकता आले नाही एवढी घोर अवकळा या समाजाला आली तरी कशाने ? इतके निर्वीर्य, निःसत्त्व हे लोक झाले कशाने ? आणि शिवछत्रपतींनी असे काय केले की ज्यामुळे एकाएकी मन्वंतर होऊन मोगली सत्तेचे निर्मूलन करण्यास मराठे समर्थ झाले ?
 वर सांगितलेले दुहीचे, यादवीचे, अराजकाचे, बंडाळ्यांचे सर्व प्रकार अकबरानंतरही चालू होते, हे एका जहांगीरच्या इतिहासावरून स्पष्ट होईल. मोंगली राज्याची त्यावरून चांगली कल्पना येईल, म्हणून तो इतिहास थोडक्यात सांगतो. जहांगीर १६०५ साली राज्यावर आला व १६२७ साली मृत्यू पावला. त्याला मुलगे चार. खुश्रू, पर्वीज्ञ, खुर्रम् (शहाजहान) आणि शहर्यार. जहांगीर राज्यावर आल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच खुश्रूने बंड केले. त्या वेळी दरबारात रजपूत व मुसलमान असे दोन तट उघड पडले होते. रजपूत पक्षाच्या साहाय्याने बापाला तख्तावरून काढून आपण राज्य घ्यावे असा खुश्रूचा विचार होता. पण त्याचा पराभव झाला. बादशहाने त्याला जीवदान दिले, पण त्याच्या पक्षाच्या हजारो लोकांना जिवंत जाळून, सोलून, बुडवून हाल हाल करून ठार मारिले. बेगम नूरजहान हिची पहिल्या नवऱ्यापासून झालेली एक मुलगी होती. तिला जो पत्करील त्याला गादी देऊन