पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

आक्रमण पराभूत करता आले नाही याचे आश्चर्य वाटते. मधूनमधून काही लढायात रजपूत मोंगलांचा पराभव करीत. जहांगीरच्या फौजेचाच रजपुतांनी १६०८ साली दिनेर येथे, १६१० साली राणपूर येथे आणि नंतर खानमेर येथे असा तीनदा पराभव केला होता. पण अखेरीस ते हरले. आणि मेवाडच्या राण्याला शरणागती पतकरावी लागली.
 आणि हीच कथा याच्या आधी चालू होती. मधूनमधून हिंदू राजे, हिंदू सेनापती खूप पराक्रम करीत. पण आत्मसंरक्षणार्थ प्रत्येक समाजात लढाईची रग अखंड असावी लागते. ती हिंदूंच्यातून नष्ट होत चालली होती असे दिसते. सेनासंघटना, शौर्य, धैर्य, नाना प्रकारचे डावपेच असलेली युद्धकला, मुत्सद्देगिरी, सावधता, हे सर्व या हिंदुसमाजातून नष्ट होत चालले होते. गझनीचा महमूद येताच १०१८ साली कनोजचा राज्यपाल पळून गेला. १०२४ साली अजमीरचा राजा पळून गेला. तेथून महमूद तसाच अनहिलपट्टणवर गेला. तेथील राजा पळून गेला. महंमद घोरीचा सरदार बख्त्यार खिलजी हा बंगालवर स्वारी करून आला. राजधानी नदिया येथे तो येताच राजा लक्ष्मणसेन बायका- पोरांना सोडून पळून गेला. आणि पुढील आयुष्य त्याने देवसेवेत घालविले ! इतर अनेक लढायात राजे प्रथमच पळून गेले नाहीत. पण लढाईला तोंड लागल्यानंतर ते पळाले. जयपाळ, आनंदपाळ व इतर अनेक रजपूत राजे यांची ही कथा आहे. एकट्या एक मलिक काफूर या अल्लाउद्दीन खिलजीच्या सेनापतीने नर्मदेच्या दक्षिणचा सर्व हिंदुस्थान पंधरा वर्षात धुळीस मिळविला. यादव, चालुक्य, होयसळ, बल्लाळ सर्व सर्व राजे व त्यांची राज्ये त्याने चुरमुऱ्याच्या पोत्यासारखी आपटली आणि रामेश्वराला मशीद बांधून हिंदुधर्माचे थडगे रचले. हा मलिक काफूर मूळचा हिंदू होता, हलक्या कुळातला होता. गुलाम होता. हिंदूमधल्या थोर क्षात्रकुळातल्या राजांना जो पराक्रम करता आला नाही तो या हीन जातीयाने मुसलमान होताच करून दाखविला. ही घटना विशेष चिंतनीय आहे. कारण हा प्रकार नित्य घडत होता. मलिक काफूर हा मूळ हिंदू गुलाम. अल्लाउद्दीनच्या मागून दिल्लीचा सुलतान झालेला मलिक खुश्रू हा मूळचा गुजराथी अंत्यज होता. तो हिंदू राहिला असता तर कधीहि सुलतान झाला नसता. लोदी सुलतान शिकंदर, निजामशाहीचा संस्थापक निजाम उल्मुल्क बहिरी, गुजराथच्या राज्याचा संस्थापक मुजफरखान,