पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
वैयक्तिक व सामाजिक

आणि पहिल्या सुलतानाला हुसकून आपण राज्य वळकवावे अशी स्थिती अकबराच्या आधी नित्याची झाली होती. पण दिल्लीसाठी भांडणारे हे लोक कोणी सय्यद होते, लोदी होते; घोरी, खिलजी, तुर्क, मोंगल होते. हिंदू कधीही नव्हते. स्थानेश्वराच्या लढाईत एकदा ११९२ साली पराभूत झाल्यानंतर हिंदूंनी हस्तिनापूरच्या या सिंहासनासाठी प्रयत्न केलाच नाही. दिल्लीची सत्ता दीर्घकाळ डळमळत्या स्थितीत होती. ती राज्यलक्ष्मी यांना सहज वश झाली असती. पण हिंदू स्थितप्रज्ञच राहिले. तिच्याकडे डोळा उचलून पाहण्याचे पापसुद्धा त्यांनी केले नाही. मग मुसलमानांनी तेथे राज्य न करावे तर काय करावे !
 वंशभेदाप्रमाणे धर्मभेदही या आक्रमकात होते. शिया आणि सुनी पंथांच्या लोकात एकमेकांविषयी अगदी कडवा, जहरी द्वेष असे. दक्षिणेतील सर्व मुस्लिम राज्ये नष्ट करावी असा औरंगजेबाचा अट्टाहास चालला होता याचे कारण हेच की ती शियापंथी होती व औरंगजेब सुनी होता. बहामनी राज्यात दक्षिणी, व परदेशी असे तट होते. ते स्थानिक मुसलमान व इराण-अफगाणिस्थानातून आलेले अशा भेदामुळे होते. पण त्यांच्यात शिया-सुनी हा भेद होताच. या दोन पक्षात कधीही ऐक्य झाले नाही. दक्षिणेतल्या बहामनी राज्यांचा इतिहास या दक्षिणी व परदेशी लोकांच्या आपसातील लोकांच्या मारामाऱ्या, रक्तपात बंडाळ्या यांनी भरलेला आहे. काही काही दिवस राजधानीत वीस वीस दिवस रक्तपात चाले, त्यामुळे राजसत्ता किती दुवबळी होत असेल याची सहज कल्पना येईल. पण हिन्दूंना ही संधि साधता आली नाही. त्यांना इहलोकीचे ऐश्वर्यभोग नकोच होते.
 अकबराच्या आधी दिल्लीची मुस्लिम मध्यवर्ती सत्ता अत्यंत प्रबळ अशी बव्हंशी नव्हतीच. नंतरहि दूरच्या प्रांतांवरचे सुभेदार या मध्यवर्ती सत्तेला भीक घालीत नसत. अयोध्येचा नबाब, बंगालचा सुभेदार, हे जवळ जवळ स्वतंत्रच होते. दक्षिणेत बहामनी राज्य स्वतंत्र झाले आणि त्याची पुन्हा पाच शकले झाली हे प्रसिद्धच आहे. म्हणजे सर्वत्र अंदाधुंदी व बेबंदशाही होती. वायव्य सरहद्दीवर बंडाळ्यांना तर कधीच खळ पडला नाही. दिल्लीच्या सत्तेवर तिकडून धाड कोसळायची हा नियमच होता. यामुळेही सत्ता दुबळी होत असे. एक सुलतान मेला म्हणजे त्याच्या मुलात राज्यासाठी लढाया व्हावयाच्या, तो जिवंत असतानाही त्याच्या मुलांनी राज्यपदासाठी बंडे