पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

त्या परक्या हिंस्र जमातींना आपल्या अंतरात पचवून, आत्मसात् करून टाकणारे जे त्या वेळचे शौर्य-धैर्यसंपन्न हिंदू लोक त्यांचेच हे पुढच्या काळातले हिंदू वंशज आहेत का, असा प्रश्न मनापुढे उभा राहतो. त्यांचे ते अतुल रणपांडित्य, ती मुत्सद्देगिरी, ती सावधता, ती स्वधर्मनिष्ठा, ते संघटनाकौशल्य हे कोठे गेले आणि का गेले, या प्रश्नांनी मन कासावीस होते. विचार करता करता बुद्धी कुंठित होते, एक एवढा समर्थ समाज एकाएकी इतका पराक्रमहीन, विकल, दुर्बल आणि नादान होईल यावर विश्वास बसत नाही; पण इतिहासात तसे प्रत्यक्ष घडलेच आहे. तेव्हा त्याचा विचार करणे प्राप्त आहे.
 इ. स. १००० पासून भारतावर आलेले इस्लामीयांचे आक्रमण हिंदूंना भारी होते असे कोणच्याही अर्थाने म्हणता येणार नाही. सतराव्या शतकात इंग्रजांचे आक्रमण भारतावर आले. त्यावेळी इंग्रज हे अत्यंत संघटित व राष्ट्रनिष्ठ असे होते. त्यांच्या राज्यात बलिष्ठ अशी मध्यवर्ती सत्ता प्रस्थापित झाली होती. आणि ती आपल्या प्रजाजनांच्या निग्रहानुग्रहाला पूर्णपणे समर्थ होती. तसा कसलाहि प्रकार मुसलमानांच्या बाबतीत नव्हता. विघटनेची, दुहीची, यादवीची जी जी म्हणून कारणे असू शकतात, समाज विशीर्ण, भग्न होऊन जाण्यास जे जे भेद,- धर्मभेद पंथभेद, सामाजिक भेद, वांशिक भेद- कारणीभूत होतात ते ते सर्व मुसलमान समाजात होते. तुर्क, अफगाण, मोंगल, इराणी, हबशी, अरबी, हिंदी असे अनेक वंशांचे लोक इस्लामीयात होते. आणि त्यांच्यात आपसात नित्य घनघोर रणकंदने होऊन भयानक कत्तलीही होत असत. १२९५ पासून १३०५ पर्यंत अमीर दाऊद, त्याचा मुलगा कुतलघखान, तुर्घाय खान, आणि ऐबकखान या मोंगल सरदारांनी दिल्लीवर अनेक वेळा लाख लाख फौजा घेऊन स्वाऱ्या केल्या. अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याशी त्यांचे भीषण रणकंदन झाले. दर वेळी सुलतानास जय मिळाला. तरी प्रत्येक स्वारीच्या वेळी प्रारंभी बिकट प्रसंग आला होता. पण या वेळी आणि पुढे असल्या कोणच्याही वेळी या आलेल्या संधीचा फायदा हिंदूंनी घेतला नाही. गुलामवंश, घोरीवंश, खिलजी, मोगल, लोदी, सूरवंश यांच्या दिल्लीच्या स्वामित्वासाठी सारख्या लढाया चालू होत्या. दिल्लीची सत्ता स्थिर, दृढ, दुर्भेद्य अशी एवढ्या दीर्घ काळात फारच थोडा वेळ होती. कोणीही यावे