पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
वैयक्तिक व सामाजिक

नव्हती. यामुळे ते अपयशी झाले हे उघडच आहे. पण या क्रांतीची प्रेरणा त्यांना झाली नाही, याचे कारणहि माझ्या मते, विश्वव्यापी संकल्पाचा अभाव हे आहे. ते स्फुरण चित्तात झाले की त्याच्या सिद्धीचे मार्गही सुचू लागतात, दिसू लागतात. पण तेच जेथे नाही तेथे हे मार्ग दिसत नाहीत आणि तसे प्रयत्नही होत नाहीत. 'हिंदवी स्वराज्या'च्या संकल्पाचे असामान्य महत्त्व वाटते ते यासाठी.
 शिवछत्रपतींच्या पूर्वी इस्लामी आक्रमणाला तोंड देऊन त्याला पायबंद घालण्याचे, आणि हिंदूंचे स्वतंत्र राज्य स्थापण्याचे दोन फार मोठे प्रयत्न झाले. आणि ते अंशतः सफलही झाले. राजस्थान आणि विजयनगर यांनी आपल्या खड्गांचे अडसर इस्लामीयांच्या मार्गात आडवे केले नसते तर चवदाव्या शतकाच्या अखेरीलाच हिंदुस्थान निर्हिंदू झाला असता. रजपूत सतत आठशे वर्षे आणि कर्नाटकी अडीचशे वर्षे या आक्रमणाशी झुंजत राहिले हा त्यांचा अत्यंत मोठा पराक्रम होय यात शंका नाही. विजयनगरचे साम्राज्य तर एके काळी कृष्णेच्या खाली सर्व दक्षिणेत रामेश्वरापर्यंत पसरले होते. आणि राज्यलक्ष्मी आपल्या वैभवानिशी त्यावेळी या प्रदेशात प्रगट झाली होती याविषयी इतिहासवेत्त्यात दुमत नाही. पण इतके होऊनहि यावनी सत्तेचे सर्व भारतातून निर्मूलन करण्यात या दोन्ही शक्तींना यश आले नाही. उलट सोळाव्या शतकात इस्लामच्या चांदापुढे त्याच नामोहरम झाल्या. आणि १५६५ साली विजयनगर व १५६८ साली चितोड पडल्यावर भारतात पुन्हा असा काळ आला की, या महापराक्रमी लोकांचे कार्य जणु झालेच नाही. पुढच्या काळात मराठ्यांना जे यश आले ते राजस्थान व विजयनगर यांना आले नाही. ते का आले नाही याची मीमांसा प्रथम आपल्याला केली पाहिजे. या पार्श्वभूमीवाचून छत्रपतींच्या कार्याचे स्वरूप स्पष्ट होणार नाही.
 वरील अपयशाची कारणे शोधण्यासाठी आपण इतिहास पाहू लागलो आणि त्यांची चिकित्सा करू लागलो की, मन उद्वेगाने भरून जाते, बुद्धी मूढ होऊन जाते. अगदी वरवर पाहिले तरी मुसलमानी आक्रमणाचा हा इतिहास मुसलमानांच्या पराक्रमाचा नसून हिंदूंच्या नादानीचा, कमालीच्या नादानीचा आहे असे स्पष्ट दिसू लागते. इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकात परक्यांची आठदहा प्रचंड आक्रमणे आपल्या बाहुबलाने सहज लीलया मोडून काढून