पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 व्यक्ती आणि समाज यांचे परस्परसंबंध काय असावे हा प्राचीन काळापासून अत्यंत वादग्रस्त असा विषय आहे. समाजातील व्यक्तीची वैयक्तिक ध्येये व समाजाची ध्येये यांचा समन्वय घालणे आणि असे करताना या दोहींच्याही आंतरिक शक्तींच्या विकासाला पूर्ण अवसर देणे यात समाजाच्या शास्त्यांचे, नेत्यांचे, तत्त्ववेत्यांचे सर्व कौशल्य आहे. हा तोल जेव्हा ढळतो, समाजरक्षणाच्या प्रयत्नांत व्यक्तींच्या सहजगुणांची जेव्हा गळचेपी होते किंवा व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेने व्यक्ती उच्छृंखल होऊन सैराट वाग लागतात, तेव्हा समाजाचा नाश होतो.
 मानवाच्या कर्तृत्वाच्या मूलप्रेरणांचा विचार याच शास्त्रात येतो. व्यक्तीचे कर्तृत्व तिच्या आंतरिक शक्तीवर अवलंबून आहे की ते परिस्थितीवर, भोवतालच्या समाजस्थितीवर अवलंबून आहे, तिच्या बऱ्यावाईट कृत्यांची जबाबदारी तिच्यावर आहे की समाजावर, याही प्रश्नाचा समाजशास्त्रज्ञ शतकानुशतक विचार करीत आहेत. आजच्या युगात व्यक्ती ही स्वयंप्रेरित, स्वयंचल आहे असे मत सर्वत्र रूढ आहे असे बाह्यतः दिसते. पण गेल्या शंभर वर्षातील मार्क्स, फ्रॉइड इ. पंडितांनी मानवी जीवनाचा एकांगी विचार करुन व्यक्तीचे कर्तृत्व सर्वस्वी अमान्य केले आहे. मात्र आपण तसे केलेले नाही असे त्यांचे मत आहे.
 व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधीच्या या वादातूनच धर्मकारण, राजकारण व अर्थकारण या क्षेत्रांत बहुविध समस्या निर्माण होतात. मोक्ष हे व्यक्तीचे अंतिम प्राप्तव्य आहे असे बहुतेक सर्व धर्म मानतात. पण ते साध्य करताना ऐहिक संसाराकडे, समाजहिताकडे तिने किती दुर्लक्ष