पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

लोक कैसे वाचू पाहातात, हा विचार करावा होता, आणि युद्धप्रसंग पाडावा नव्हता.' पुढे समेटाच्या कलमामध्यें दुष्ट, हिंदुद्वेषी यास आपले राज्यात ठेवू नये, विजापूरकरांची चाकरी करू नये, त्यास फार तर सैन्याची मदत करावी इ. कलमे छत्रपतींनी मुद्दाम घातली आहेत. औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर बसविला त्यावेळी त्याची कडक शब्दात छत्रपतींनी निर्भर्त्सना केली. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, 'पातशाही पुरातन हिंदूंची आहे. पातशाही तुमची नाही. गरीब, अनाथ (हिंदू) त्यास उपसर्ग करण्यात आपला मोठेपणा नाही. (शककर्ता शिवाजी- सरदेसाई, पृ. २०२. छत्रपतींच्या मनात हिंदुपदपातशाहीचा संकल्प कसा होता त्याचे विवेचन याच ग्रंथात सरदेसाई यांनी पृ. २२१ वर केले आहे.) सकल अवनिमंडल यवनमुक्त करावयाचे आहे ही आकांक्षा प्रारंभापासूनच छत्रपतींनी मराठ्यांच्या ठायी दृढमूल करून टाकिली होती यात शंकाच नाही. अत्यंत पडत्या काळातसुद्धा छत्रपति राजाराम यांच्या मनातील हे अनुसंधान सुटले नव्हते. त्यांच्या काही फौजा नर्मदा उतरून पलीकडे गेल्याही होत्या. हणमंतराव व कृष्णाजी घोरपडे यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपति राजाराम म्हणतात- 'महाराष्ट्रधर्म पूर्ण रक्षावा, हा तुमचा संकल्प स्वामींनी जाणून तुम्हास सहा लक्ष होनांची नेमणूक चालविण्याचा निश्चय करून दिधला असे. पैकी रायगड प्रांत, विजापूर, भागानगर व औरंगाबाद हे चार प्रांत काबीज केल्यावर तीन लाख व बाकीचे तीन लाख प्रत्यक्ष दिल्ली काबीज केल्यावर द्यावयाचे, असा निश्चय केला आहे.' पुढल्या काळच्या पत्रातून तर हिंदुस्थानच्या पलीकडे काबूल, कंदाहार, इराण, तुराण, इस्तंबूल येथपर्यंत मराठ्यांच्या आकांक्षा धावत होत्या हे स्पष्ट दिसून येते. हे सर्व सविस्तर सांगण्यात हेतू हा की, मराठ्यांच्या यशाचे मर्म छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या या संकल्पात आहे हे ध्यानी यावे. तत्पूर्वीच्या लोकांनी पराक्रम केले, नाही असे नाही. पण त्यांचे संकल्पच लहान होते. त्यांची झेप अल्प होती. अखिल हिंदुस्थान यावनी सत्तेपासून मुक्त करण्यात त्या महापराक्रमी लोकांना यश आले नाही त्याचे हे प्रधान कारण आहे. इतर कारणे तितकीच बलवत्तर आहेत. छत्रपतींनी जी राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक- सर्वांगीण क्रांति घडवून आणली तिची त्यांना कल्पनाही नव्हती. आणि तिच्याविना भारतात नवी शक्ती निर्माण होण्याची शक्यताच