पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

ठरवून तो करणाऱ्यांना कित्येकदा जिवंत जाळले, इस्लामच्या अभिमानाने लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या आणि हिंदूंना हिंदू म्हणून जगणे अशक्य करून टाकण्याचे सर्व प्रयत्न केले. हिंदवी स्वराज्याची आवश्यकता निर्माण झाली ती त्यासाठी. हिंदू धर्म, हिंदू संस्कृति, परंपरा, भाषा, विद्या- म्हणजे एकंदर अस्तित्वच टिकवावयाचे असेल तर इस्लामी साम्राज्य नष्ट करून भारतात हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच पाहिजे, असे इतिहास आक्रंदून सांगू लागला. हिंदू, जैन, बौद्ध, यांची राज्ये झाली. पण दोघांपैकी एकालाच जगता येईल, दुसऱ्याचा नष्टांशच झाला पाहिजे अशी वृत्ती भारतात केव्हाच निर्माण झाली नव्हती. मुसलमानांच्या आक्रमणानंतर असा बिनतोड प्रसंग निर्माण झाला. ही भूमी निर्हिंदू झाली पाहिजे अशी भीषण मनीषा इस्लामीयांनी धरली होती.
 अलीकडे इतिहास-विवेचन करताना आणि शिवकार्याचे विवरण करताना छत्रपतींच्या आधीच्या काळात महाराष्ट्रात व दक्षिणेत तरी निदान हिंदूंचा धार्मिक छळ होत नव्हता, हिंदु धर्माचा उच्छेद करणारी अशी राजसत्ता येथे नव्हती, राजदरबारी, लष्करामध्ये आणि सर्वत्र मराठा सरदारांचे प्राबल्य असल्यामुळे हिंदूंचा धार्मिक छळ होणे संभवनीयच नव्हते, असा सिद्धान्त मांडला जातो. आणि त्याला रानडे, राजवाडे, सरदेसाई, पारसनीस यांचे आधार दिले जातात. (धर्म की क्रांति - लालजी पेंडसे, पृ. १३, १४) या थोर पंडितांनी अशी वाक्ये लिहिली आहेत हे खरे. पण त्यांचे समग्र ग्रंथ वाचले म्हणजे त्यांचा अभिप्राय इतका एकांतिक नव्हता हे सहज कळून येईल. आणि प्रत्यक्ष इतिहास पाहिल्यावर या भ्रमाचा तत्काळ निरास होईल. १६३७ ते १६४० या तीन वर्षात विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार रणदुल्लाखान याने कर्नाटकावर तीन स्वाऱ्या केल्या. त्या अत्यंत यशस्वी झाल्या. या स्वारीत मुख्य पराक्रम शहाजी राजे यांनी केला. आणि त्याचे फलित काय ? तर 'आम्ही दक्षिणचे सर्व राजे-महाराजे जिंकले, मोठमोठी मंदिरे धुळीस मिळविली, आणि तीन वर्षांच्या अवधीत सेतुबंध रामेश्वराची भक्ती करणाऱ्या हिंदूंच्या शेंड्या कापून काफरांचे निर्मूलन केले.' असा सार्थ अभिमान आदिलशहाने मिरविला. मराठे सरदार मुसलमानांच्या लष्करात असल्याचा हा फायदा ! आणि ज्यांना दक्षिणेत मुसलमानांनी धर्मच्छल केला की नाही याविषयी शंका असेल त्यांनी सरदेसाई यांच्या 'मुसलमानी रियासत' (भाग १ ला) या