पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
वैयक्तिक व सामाजिक

पोळ, कत्तल, विध्वंस हे सर्व करीत. येथे राज्येही स्थापीत. पण वैदिक वा बौद्ध धर्माचा नाश करावा, त्या धर्माचे मठ, विहार, त्यांची मंदिरे, त्यांच्या मूर्ति, त्यांची विद्यालये, त्यांचे पूज्य ग्रंथ यांचा विध्वंस करावा असे त्यांचे धोरण नव्हते. उलट हळूहळू त्यांनीच हिंदू वा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. कोणी भागवत झाले, कोणी शैव झाले आणि कालांतराने हिंदूंनी या सर्वांना आत्मसात् करून टाकले. त्यांना चातुर्वर्ण्यात स्थाने देऊन- ब्राह्मण, क्षत्रिय अशी प्रतिष्ठेची स्थाने देऊन-येथल्या समाजाशी एकरूप करून टाकले. त्यांचा परकेपणा नष्ट झाला, भिन्नपणा लुप्त झाला. त्यामुळे हिंदू सम्राटांना आमचे राज्य हे 'हिंदवी राज्य' आहे असा घोष करण्याचे कारणच नव्हते.
 १००१ साली गझनीच्या महंमदाने अटक ओलांडून हिंदुस्थानवर स्वारी केली त्यावेळी हे कारण प्रथम निर्माण झाले आणि त्यानंतर उत्तरोत्तर असा घोष करण्याची आवश्यकता तीव्रतेने निर्माण होत होती, उत्कटतेने भासमान होत होती; पण दुर्दैव असे की, साडेसहाशे वर्षांत असा महाघोष भारतात कोणी केला नाही. तसे स्फुरण कोणाच्याहि चित्तात झाले नाही ! साडेसहाशे वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर, या तमोयुगानंतर शिवछत्रपतींच्या मुखाने भारतवर्षाने हा घोष केला. हिंदवी स्वराज्य !
 मुसलमानी आक्रमणापासून असा घोष करण्याची आवश्यकता उत्पन्न झाली याचे कारण अगदी उघड आहे. हिंदू धर्म, हिंदू संस्कृति, हिंदू परंपरा हिंदू जनता यांचा संपूर्ण नायनाट करण्याच्या प्रतिज्ञा करूनच इस्लामीयांनी भारतात पाऊल टाकले. गझनीच्या महंमुदानेच या भीषण हत्याकांडाला प्रारंभ केला. नगरकोट, स्थानेश्वर, मथुरा, कनोज, सोमनाथ येथील देवालये त्याने लुटली, मूर्ति फोडल्या, त्यांची विटंबना केली. लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या, लाखोंना बाटविले. हाच भयानक प्रलय पुढे सातआठशे वर्षे चालू होता. आणि आजही इस्लामीयांची तीच वृत्ती कायम आहे याचा पाकिस्तानात हरघडी प्रत्यय येत आहे. महंमदानंतरच्या अनेक सुलतानांनी हिंदु-मुसलमानांना सहजीवन अशक्य आहे, हिंदूंचा नायनाटच केला पाहिजे, त्यांच्या धर्माचा नाश केला पाहिजे हेच धोरण, हेच ब्रीद मिरविले. त्यांनी हिंदूंवर जिझिया कर वसविला. त्यांची मंदिरे, विद्यालये, धर्मग्रंथ व स्त्रिया यांची विटंबना केली, मुसलमानी कायदा त्यांच्यावर लादला. मूर्तिपूजा हा गुन्हा