पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

यांची कीर्ति दिगंत पसरली होती. या काळात हिंदूंच्या वैदिक धर्माच्या जोडीला बौद्ध व जैन हे धर्म भारतात नांदत होते. त्या धर्मांचे अनुयायी असलेले राजे आणि सम्राटहि भारतात अधिराज्य चालवीत होते. सम्राट् अशोक, कलिंगराज खारवेल, श्रीहर्ष, महानंदपाल हे बौद्ध सम्राट् होते. अमोघवर्ष हा जैन होता. चंद्रगुप्त मौर्य, शातवाहन राजे, मगधाचे चंद्रगुप्त हे सम्राट्, चालुक्य घराण्यातील पुलकेशी, विक्रमादित्य हे सर्व हिंदु असून वैदिक धर्मानुयायी होते, गोब्राह्मणप्रतिपालक होते, यज्ञकर्ते होते हे प्रसिद्धच आहे. पण आपले राज्य हिंदूंचे आहे, आर्यांचे आहे असा घोष त्यांनी कधीच केला नव्हता. त्यांना तसे करण्याचे कारणच नव्हते. कारण वर उल्लेखिलेले सर्व सम्राट् हे इतर धर्मांचा व त्यांच्या अनुयायांचा स्वधर्मीयांइतकाच प्रतिपाळ करीत व त्यात भूषण मानीत. राजे वैदिक असले तरी बौद्धांना विहार बांधून देणे, त्यांना वर्षासने देणे, त्यांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणे व सर्व प्रकारे त्यांची प्रतिष्ठा राखणे हे ते कटाक्षाने कर्तव्य म्हणून करीत. जैन व बौद्ध राज्यकर्त्यांचे धोरणहि असेच सहिष्णुतेचे होते. अशोकाने सहिष्णुतेचे व्रत चालविलेच पण शिवाय सर्वांनी परपंथीयांचा गौरव करावा, त्यात कमीपणा मानू नये असे एका शासनात त्याने सांगून ठेवले आहे. सम्राट् हर्ष दर पाच वर्षांनी आपल्या संपत्तीचा दानधर्म करी. या उत्सवात एक दिवस बुद्धाची, दुसरे दिवशी सूर्याची तर तिसऱ्या दिवशी शिवाची पूजा होई. या वेळी बौद्ध भिक्षूंप्रमाणेच वैदिक ब्राह्मणांचीही संभावना तो उदार मनाने व मुक्त हस्ताने करीत असे. अशा रीतीने सहिष्णुता व सहजीवन हे धोरण सर्व राज्यकर्त्यांनी अवलंबिले असल्यामुळे हे अमक्या धर्माचे राज्य आहे अशी द्वाही फिरविण्याची त्यांना आवश्यकताच भासली नाही.
 ग्रीक, शक, यवन, युएची, हूण यांची उल्लेखिलेली आक्रमणे झाली ती याच काळात. हे लोक सर्व बाह्य होते आणि यांची आक्रमणेही फार प्रचंड होती. या हजार-बाराशे वर्षांच्या काळात शक- यवन- हूणांच्या जमातीचे लाखो लोक हिंदुस्थानात आले आणि मगध, सौराष्ट्र, महाराष्ट्र येथपर्यंत घुसून तेथे स्थायिकही झाले. यावेळी आर्य व आर्येतर किंवा वैदिक व वैदिकेतर असा भेद प्रकर्षाने जाणवण्याचा संभव होता. पण या जमातींना स्वतःचा विशेष रूपास आलेला असा धर्म नव्हता. त्या लुटारू म्हणून येत, लूट, जाळ-