पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५१
ते समाजाला विचारा

प्रदेशातली गुन्हेगारी वाढवून ठेवली. सध्या आपला हाच उद्योग चालू आहे ! तुरुंगात आपण गुन्हेगारांना मायेने वागवून त्यांचे जिणे सुसह्य करीत आहोत. त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे आणि जनतेला मात्र जिणे असह्य होत आहे. भारताला सामान्य व्यवहाराच्या पातळीवर राहणे कधीच आवडत नाही, हे त्याचे मुख्य दुर्दैव आहे. राजकारणात राष्ट्रीय पातळीवरून विचार न करता आपण नेहमी आंतरराष्ट्रीय पातळीवरून बोलतो. त्याचप्रमाणे हृदयपरिवर्तन, मानसशास्त्र या मार्गांनी मानवातला परमेश्वर जागा करण्याचा आपल्याला कायमचा हव्यास लागला आहे. प्रत्यक्षात मात्र शिक्षेचे भय नाहीसे झाल्यामुळे त्याच्यातला पशु जागा होत आहे. अमेरिकेतल्या मानसशास्त्रीय प्रयोगामुळे हेच घडत आहे, हे डॉ. रुथ अलेक्झांडर यांचे मत वर दिलेच आहे. मला वाटते आपण हे महान् आणि भव्य प्रयोग बंद करून मानवातला मानवच जागा करण्याचा प्रयत्न केला तर बरे होईल. तसे करावयाचे म्हणजे मानवाचे प्रवृत्तिस्वातंत्र्य किंवा आत्मस्वातंत्र्य मान्य केले पाहिजे. कारण तेच मानवत्वाचे मुख्य लक्षण आहे. सध्या भारतात कोणावरही कसलीही जबाबदारी नाही. वाटेल ते अनर्थ येथे घडत आहेत. पण त्याला जबाबदार कोणीही नाही. प्रत्येक जण 'ते समाजाला विचारा' असे म्हणत आहे. आत्मस्वातंत्र्याचे महत्त्व आपल्याला कळले तर 'ते मला विचारा' असें म्हणण्याचा कणखरपणा आपल्या ठायी निर्माण होईल; आणि त्यातच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली आहे.