पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
वैयक्तिक व सामाजिक

मानवाचे मानवत्वच नाकारणे होय. महात्माजींनी केलेले अबदुल रशीदचे समर्थन तर अत्यंत विपरीत आणि तितकेच समाजघातक आहे. महात्माजी म्हणाले की, तो गुन्हेगार नाही. तर ज्यांनी प्रक्षोभ माजविला ते गुन्हेगार ! ते तरी गुन्हेगार काय म्हणून ? प्रक्षोभ माजवावा अशी त्यांना बुद्धी झाली. हाही दुसऱ्या परिस्थितीचा परिणामच होय. किंवा त्यांच्या मनातल्या पूर्वीच्या सुप्त गंडांनी त्यांना प्रेरित केले असेल; म्हणून ते गुन्हेगार नाहीत. आणि महात्माजी मोठ्या औदार्याने त्याला भाई म्हणाले हाही त्यांच्या ठायीच्या कोठल्या तरी सुप्त अहंगंडाचा परिणाम होय असे म्हणावें लागेल. एका खून करणाऱ्या मानवाला जबाबदारीतून मुक्त करून भागणार नाही. सर्वांनाच ओंडके करून टाकावे लागेल. म्हणजे त्यांना आत्मस्वातंत्र्य नाही असे म्हणावे लागेल. अमेरिकेचा अधःपात या नव्या उदार दृष्टीमुळेच झाला आहे असे अलेक्सिस कॅरेलचे म्हणणे आहे. (मॅन दि अन्नोन, पृ. २५०)
 सध्या स्वतंत्र अवलोकन व शास्त्राभ्यास यांचा भारतात अभाव असल्यामुळे आपणही अमेरिकेतले औदार्याचे प्रयोग करीत आहोत. शाळेत मुलांना शिक्षा करावयाची नाही, घरी धाक दाखवावयाचा नाही, आणि समाजात, सभा-संमेलनात, युवक- महोत्सवात त्यांचा आत्माविष्कार होऊ द्यावयाचा. याचा परिणाम काय होतो आहे ते दिसतेच आहे. विद्यार्थी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे बंद पाडीत आहेत. संमेलने, युवकमहोत्सव उधळून लावीत आहेत. आणि समाजाचे धुरीण मानसशास्त्रात याचे मूळ शोधीत आहेत ! गुन्हेगारांवरही मानवतेचे महान् प्रयोग चालू आहेत. आटपाडीजवळ मध्यंतरी काही खुनी माणसांची मुक्त वसाहत केली होती. त्यांना जमिनी दिल्या होत्या. 'मानवतेचा महान् प्रयोग' म्हणून त्याचा वृत्तपत्रात गौरव झाला. आचार्य विनोबांनी मध्यप्रांतातील खुनी, दरोडेखोर यांच्यावर असेच मानवतेचे प्रयोग केले. वास्तविक हृदयपरिवर्तनाचे कसब आपल्या ठायी आहे असे विनोबांना वाटत होते तर काळा बाजारवाले, प्राप्तिकर चुकविणारे, दारूभट्ट्या चालविणारे, लाच खाणारे सरकारी अधिकारी, भारतातल्या सर्व सरकारी रुग्णालयातले डॉक्टर, परिचारिका, गडी यांच्यावर, त्यांनी प्रयोग करावयाचा होता. तो तरी महागात पडला नसता. पण त्यांनी खुनी दरोडेखोर यांच्याकडे आपल्या सहानुभूतीचा ओघ वळविला आणि मध्य-