पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९
ते समाजाला विचारा

त्याची ज्ञानलालसा, सौंदर्याभिरुची हे सर्व अगण्य असे आहे. याची अवहेलना केल्यामुळे मानवाचा अधःपात होत आहे.
 या अगण्य अशा अंतःशक्तीच्या बळावरच मानव हा मानव झाला आहे. आणि तिच्यामुळे स्वतःच्या अंतःसृष्टीवर व बाह्यसृष्टीवर मनुष्याने प्रभुत्व प्रस्थापित केले आहे. असे असताना, माझा मी प्रभु नाही, माझ्या हातून जे घडले त्याला मी जबाबदार नाही, ही भूमिका मानवाने घेणे हा त्याचा कमालीचा अधःपात आहे. परिस्थिति म्हणजे तरी काय ? अन्य मानवांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर ठरवलेले कायदे, प्रसृत केलेले विचार, दृढमूल केलेल्या रूढी आणि रूढविलेली समाजाची रचना. हे सर्व जर वाईट असले तर दुसऱ्या मानवांनी आपल्या इच्छाशक्तीने ते हाणून पाडणे, बदलणे, हाच त्यावर उपाय आहे. परिस्थिति म्हणजे दुसऱ्या कोणाची तरी इच्छाशक्तीच असते. आणि ती सुधारण्यास दुसरी इच्छाशक्तीच अवश्य असते. अशा स्थितीत एखाद्याची इच्छाशक्ती कमजोर झाली आणि तो परिस्थितीला बळी पडला तर त्याच्याविषयी सहानुभूती दाखविणे, त्याला साह्य करणे योग्य ठरेल इतकेच. पण त्याचे समर्थन करणे म्हणजे मानवत्वाचा पायाच उखडून टाकणे होय. गडकऱ्यांची द्रुमन ही अबला आहे. असहाय आहे. तिला संयम, मनोनिग्रह साधला नाही. ती दुष्टाच्या कारस्थानाला बळी पडली. तिच्याबद्दल अनुकंपा वाटणे, तिला जवळ घेणे सर्वथैव योग्य आहे. पण ती असहाय स्त्री बळी पडली म्हणून ही सहानुभूती आहे. पण ती जर 'ते समाजाला विचारा' 'ते राक्षसी रूढीला विचारा' असे म्हणून आपले समर्थन करू लागली तर तितकी अनुकंपा वाटणार नाही. कारण संयम करणे, निग्रह करणे याचें आत्म-स्वातंत्र्य असलेली ती एक मानव-व्यक्ती आहे, याच कल्पनेला त्यामुळे धक्का बसतो. तरी तिच्या बाबतीत सर्वच क्षम्य वाटणे हे शक्य आहे. पण परीक्षेत वाममार्गाचा विद्यार्थ्याने अवलंब केला आणि त्यात त्याचा दोष नाही, असे त्याचे प्राध्यापक म्हणू लागले तर ते दोघेही गुन्हेगार आहेत असे म्हणावे लागेल. कारण तेथे मनुष्याला त्यांनी लाकडाचा ओंडका मानले, असे होते. परीक्षेला महत्त्व आहे तर जास्त अभ्यास करणे, कसून मेहनत करणे आणि परिस्थितीवर मात करणे हे सामर्थ्य मानवाच्या ठायी आहे. असे असताना परिस्थितीला दोषी ठरवून त्या विद्यार्थ्याला दोषमुक्त करणे म्हणजे
 वै. सा. .. ४