पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
वैयक्तिक व सामाजिक

स्वातंत्र्याचा जो समाजाने अवमान केला आहे, त्याचे हे सर्व दुष्परिणाम आहेत. जुन्या कर्मतत्त्वाचीच ही नवी रूपे आहेत. नियतीच्या, कर्माच्या हातचे मनुष्य हे बाहुले आहे, असे सनातन पंडित मानीत. आता आर्थिक परिस्थितीच्या किंवा सुप्त मनोगंडांच्या हातचे ते बाहुले आहे, असे नवे पंडित सांगतात. दोन्हींचा तात्पर्यार्थ एकच होतो. मानवाला आत्मस्वातंत्र्य नाही ! वास्तविक मानवाच्या जीवनाची सर्व प्रतिष्ठा त्याच्या आत्मस्वातंत्र्यात आहे. आणि मानवी जीवनाची प्रतिष्ठा हा तर लोकशाहीचा पाया मानला जातो. तरी सर्वात पुढारलेल्या लोकायत्त देशांनी ती प्रतिष्ठा धुळीस मिळवावी यापरता दैवदुर्विलास कोणता ? मानवाला त्याच्या कृत्याबद्दल जबाबदार धरणे, यातच खरोखर त्याची प्रतिष्ठा राखली जाते. नाहीतर त्याच्यात आणि दगडात फरक तरी कोणता ? त्याच्यावर परिस्थितीचे परिणाम होत नाहीत असे कोणीच म्हणत नाही. वर सांगितलेच आहे की, आनुवंश, भौगोलिक परिस्थिती, शिक्षणसंस्कार, सर्व सर्व गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत असतो. पण जडवस्तूप्रमाणे अमक्या संस्काराचा अमुक परिणाम, अमक्या परिस्थितीचे हे फल असे मुळीच सांगता येत नाही. यावरून मानवाच्या अंतरात बाह्य संस्कारांच्या परिणामाचे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वाटेल ते रसायन तयार करणारी अशी एक स्वतंत्र शक्ती आहे हे उघड दिसते. या शक्तीच्या आधारावरच धर्म, नीति, या निष्ठा आजपर्यंत जगत आल्या आहेत. आता या नव्या शास्त्रांनी त्यांचा तो आधार काढून घेतला आहे. म्हणून मानवाचे चारित्र्य, त्याची नीति, त्याचा धर्म हे सर्व निराधार झाले आहे.
 अलेक्सिस कॅरेलच्या मते पाश्चात्त्य संस्कृतीचा, अमेरिकन संस्कृतीचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. आणि जडसृष्टीचे नियम मानवाला लावणे हे त्याचे त्याच्या मते प्रधान कारण आहे. गणिताने, फूटपट्टीने, तराजूने जे मोजता येत नाही, ज्याचा काटेकोर हिशेब करता येत नाही, ज्याचे बिनचूक मापन करता येत नाही, ते गौण होय, त्याला महत्त्व नाही असे शास्त्रज्ञ मानतात. कोणी कोणी त्याचे अस्तित्वच नाकारतात. कॅरेलच्या मते विज्ञानाने हा अत्यंत मोठा प्रमाद केला आहे. मानवाच्या बाबतीत तर जे मापनीय आहे, गण्य आहे, त्याच्यापेक्षा जे अमापनीय, अगण्य आहे तेच जास्त महत्त्वाचे आहे. आणि मानवाची धर्मनिष्ठा, नीतिनिष्ठा, त्याच्या भावना, त्याची सुखदुःखे,