पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७
ते समाजाला विचारा

आम्ही गप्प बसतो व जिम त्या घाणेरड्या चित्रपटाला जातो. सॅली चार वर्षांची आहे. धाकट्या बाळाला दूध पाजू लागताच ती रोज बाटली हिसकून घेते. मग आईने काय करावे ? ती बाहेर गेल्यावर बाळाला बाटली द्यावयाची ! कारण सॅलीला रागावले तर बहिणीबद्दल तिला वाटणारा मत्सर दडपला जाईल ! एका स्त्रीचा १० वर्षांचा मुलगा फिलिप घरात चोऱ्या करू लागला. त्याने वडिलांच्या खिशातील नोटा लांबविल्या. पुढे चोरी उघडकीला आल्यावर आईने त्याला जाब विचारला. तो म्हणाला, 'मला निष्णात चोरी करता येते की नाही हे पहावयाचे होते.' त्याला शिक्षा करण्याचे धैर्य आईला झाले नाही. कारण ती व्हिक्टोरियन युगातली ठरली असती ! ही उदाहरणे सांगून, आम्हा मातापित्यांच्या दुबळेपणाला फ्रॉईडचे मानसशास्त्र कारणीभूत आहे, असे जेन व्हाइट ब्रेडने म्हटले आहे.
 अलेक्सिस कॅरेल या थोर शास्त्रज्ञाने हेच मत दिले आहे. त्याने सर्वच परिस्थितिवादी पंथांचा विचार केला आहे. तो म्हणतो की, अर्थवादी लोकांनी हे ध्यानात घ्यावे, की रोजगार, अन्न, विश्रांती यांखेरीज आणखीही कशाची तरी मनुष्याला गरज असते. शरीर-गरजांप्रमाणेच आत्मिक गरजाहि मनुष्याला असतात. आणि आर्थिक आपत्तींना नैतिक व वैचारिक कारणेही असू शकतात. मनुष्याला अर्थबद्ध यंत्र मानणे हे जसे घातक तसेच, तो केवळ मनोगंडाधीन आहे असे मानणे हेही घातक आहे, हा विचार सांगून कॅरेल म्हणतो की, फ्रॉइडने जडवादी लोकांपेक्षाही समाजाचा घात केला आहे. (मॅन दि अन्नोन, पृ. २५८) अमेरिकन पंडित हळूहळू भ्रामक परिस्थितिवादातून बाहेर पडत आहेत असे दिसत आहे. 'सोसायटी इन ट्रँझिशन' या आपल्या ग्रंथात हॅरी बार्नेस याने सविस्तर विवेचन केले आहे. तो म्हणतो की, मनोदौर्बल्यामुळे गुन्हे घडतात किंवा गरिबीमुळे मनुष्याची तिकडे प्रवृत्ती होते हे मत आता मागे पडत आहे. कारण वस्तुस्थिती त्याला आधार देत नाही. बहुतेक गुन्हेगार चांगले बुद्धिमान व धूर्त असतात. आणि अमेरिकेतील संघटित गुन्हेगारीचा व गरिबीचा काहीच संबंध नाही. बहुतेक गुन्हेगार चांगले प्रतिष्ठित व सुस्थित असे असतात (पृ. ७२०).
 अर्वाचीन काळात लोकायत्त देशात शास्त्राच्या आधाराने मानवाच्या मानवत्वाचा, त्याच्या व्यक्तित्वाचा, त्याच्या इच्छास्वातंत्र्याचा, प्रवृत्ति-