पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६ 
वैयक्तिक व सामाजिक

वंचित असा समाज, असा वर्ग तेथे नाही. प्रत्येक व्यवहार लोकायत्त असल्यामुळे आणि हजारो सार्वजनिक संस्था प्रत्येक प्रांतात असल्यामुळे आपल्या अहंगंडाची तृप्ती प्रत्येकाला करून घेता येते. खेळ, नाट्य, नृत्य, काव्य, यातून वासनांचे उन्नयन व निचरा करण्याची संधि जगात कोठे नसेल इतकी तेथे आहे. असे असूनही तेथे दरसाल गुन्हेगारांची, बालगुन्हेगारांची, घटस्फोटांची, वेड्यांची, भ्रष्टांची, पतितांची, अफीणांची, जुगाऱ्यांची संख्या वाढतच आहे.
 या सर्वाला कारण नवा परिस्थितिवाद, नवे मानसशास्त्र, हे आहे असे अमेरिकेतील विचारवंतच आता सांगू लागले आहेत. 'ते समाजाला विचारा' ही वृत्ती या अनर्थाला कारण झालेली आहे. 'नॅशनल शेरीफ असोसिएशन-' पुढे बोलताना डॉ. रूथ अलेक्झांडर यांनी हेच विचार मांडले आहेत. "बाल गुन्हेगारांना मायाळूपणे वागवावे, त्यांना गुन्हेगार न मानता रोगी मानावे, त्यांच्या मनोव्यापाराचे मानसशास्त्रीय अवागाहन करावे, या विचारसरणीतून हे अनर्थ निर्माण झाले आहेत. याचा परिणाम असा झाला की आपल्याला कसलीही शिक्षा होत नाही हे ध्यानात आल्यामुळे बाळांच्या मनातला दैवी अंश जागा होण्याऐवजी सैतान फक्त जागा झाला आहे," असे त्या म्हणतात. न्यायमूर्ति विल्फ्रेड वॉल्टमेड यांच्या मते या गुन्हेगारीच्या वाढीला सध्याची शिक्षणपद्धति म्हणजे तेथले मानसशास्त्र हे कारण आहे. मुलांना स्वातंत्र्य द्यावे, त्यांचे मानसशास्त्र पाहावे, त्यांचा आत्माविष्कार होऊ द्यावा, हे जे थोतांड माजले आहे त्याचे हे परिणाम आहेत. घरी, दारी, शाळेत, कोठेही मुलांच्यात अपप्रवृत्ती दिसताच त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. यावरून मुलांना त्यांच्या गुन्ह्याबद्दल जबाबदार धरावे असे न्यायमूर्तीचे मत आहे हे स्पष्ट दिसते. जेन व्हाईट ब्रेड या बाईंनी नव्या मानसशास्त्राने अमेरिकन घरात काय अनर्थ घडविला आहे त्याचे सविस्तर वर्णन केले आहे. मुलांना दटावावे, काही गोष्टी त्यांना मना कराव्या, हे कोठे राहिलेच नाही. कारण त्यांच्या वासना दडपल्या जातील; आणि मग त्यांच्या नेणीवेत अनिष्ट गंड तयार होतील ! माझा मुलगा जिम याला त्या अमक्या चित्रपटाला जायचे आहे. तो चित्रपट घाणेरडा आहे हे आम्हाला- त्याच्या मातापित्यांना- माहीत आहे. पण आपल्या मनाईने त्याची इच्छा दडपणे योग्य नव्हे म्हणून