पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५
ते समाजाला विचारा

नेहमी म्हणत असे की, जगात जुलूम चालतो, किंवा जुलूम करणारे लोक असतात, हे मला मान्यच नाही. मला एकच सत्य माहीत आहे. जगात जुलमापुढे मान वाकविणारे, भेकडपणे अन्याय सोसणारे लोक फक्त असतात !
 जे समाजाच्या बाबतीत तेच व्यक्तीच्या बाबतीत खरे आहे. कोणत्याही कारणाने व्यक्तीने परिस्थितिवाद स्वीकारला, आपल्या अधःपाताचे उत्तरदायित्व आपल्याकडे नाही, अशी समजूत करून घेतली, 'ते समाजाला विचारा' अशी वृत्ति स्वीकारली की, तिला व म्हणूनच समाजाला झपाट्याने अवकळा येऊ लागते. याबाबत अमेरिकेचे उदाहरण अत्यंत उद्बोधक आहे. नवी तत्त्वज्ञाने अंधपणे स्वीकारण्यापूर्वी भारताने सध्याच्या अमेरिकन समाजाचा फार बारकाईने अभ्यास करणे अवश्य आहे.
 अमेरिकेत आज गुन्हेगारी किती वाढली आहे याची सहजासहजी आपल्याला कल्पना येणार नाही. पण आपला समाज सर्वनाशाच्या कडेवर येऊन ठेपला आहे, असे तेथले विचारवंत आज सांगू लागले आहेत. दर १९ सेकंदाला तेथे एक गुन्हा घडतो. म्हणजे वर्षाला १६ लक्ष गुन्हे होतात. त्यात १२९६० खून असतात. दिवसाला तेथे ३६ खून होतात ! हे आकडे १९४९ सालचे आहेत. आता हे प्रमाण दुपटीवर सहज गेले असेल. वेड्या माणसांचे प्रमाण तेथे असेच वाढत आहे. १८८० साली दर लाखात ६४ माणसे वेडी असत. १९४६ साली हे प्रमाण ३७५ वर आले आहे. चोरी, सुरामारी, बलात्कार, दरोडेखोरी याला तेथे सीमाच राहिली नाही. त्या समाजाचा हा भयानक अधःपात कशामुळे झाला आहे ?
 आज पन्नाससाठ वर्षे अमेरिका नवे अर्थशास्त्र, नवे मानसशास्त्र, नवे गुन्हेगारीचे शास्त्र यांच्या आधारे समाजावर उपचार करीत आहे. शिवाय गुन्हा अपरिहार्य करून टाकणारी परिस्थिति तर तेथे आता मुळीच नाही. दारिद्र्य, अन्नान्न दशा, बेकारी, उपासमार यांमुळे मनुष्य गुन्ह्याला प्रवृत्त होतो असे पूर्वी रूढ मत होते; पण सध्या अमेरिकेत ऋद्धीसिद्धी पाणी भरीत आहेत. कामगारांना ४०० रु. महिना हे किमान वेतन आहे. अमुक एक सुखसोय तेथल्या जीवनात नाही, असे नाहीच. कामवासनेच्या तृप्तीचा तेथे प्रश्नच उद्भवत नाही. तारुण्यात पदार्पण करताच, किंवा त्याच्या आधीच तरुण- तरुणींना एकमेकांचा सहवास, अगदी निकट सहवास लाभतो. सत्तेपासून