पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
वैयक्तिक व सामाजिक

आपण जबाबदार आहो ही जाणीव स्वतःला व स्वसमाजाला करून देण्यास तो अजूनही सिद्ध नाही. हे नाही तोपर्यंत वरील वैभवशाली कर्तृत्व तो निर्माण करू शकणार नाही.
 सुदैवाने डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाला हे महनीय तत्त्व पटवून देण्याची शिकस्त केली आहे. सर्व समाज व विशेषतः ब्राह्मण यांच्यावर ते भडिमार करतात, आग पाखडतात. आणि ते करणे योग्यच आहे. कारण अस्पृश्यांच्या हीनावस्थेला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे त्रैवणिक निश्चितच जबाबदार आहेत. पण काही झाले तरी अंती स्वतःच्या उत्कर्षापकर्षाला ज्याचा तोच जबाबदार असतो, अंतिम जबाबदारी त्याचीच असते, हा कटु पण सत्य विचार आंबेडकर अस्पृश्यांच्या मनावर ठसवीत असत. त्या समाजापुढे बोलताना शत्रू वापरणार नाही, अशा कटु आणि मर्मभेदक शब्दात ते लोकांना बोलत. सवर्ण समाजाने खूप छळले पण तुम्ही ते का सोसले, तुम्ही अन्यायाचा प्रतिकार करताना मरून का गेला नाहीत ? असा सवाल ते करीत; आणि त्यांच्यापुढे जगायचे असेल तर वाघ म्हणून, नेते म्हणून जगा, शेळी म्हणून, गुलाम म्हणून, जगू नका, असा उपदेश करीत.
 विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर पदोपदी इंग्रजी राज्यामुळे भारतात कसे अनर्थ होत आहेत, हे भारतीय जनतेला समजावून देत असत. टिळकांनी तर त्या ब्रिटिश राज्याविरुद्ध भारतात असंतोष निर्माण केला. येथल्या दारिद्र्याला, येथल्या विघटनेला आणि भारताच्या हरएक प्रकारच्या विपन्नावस्थेला ब्रिटिशच जबाबदार आहेत असे या धुरीणांचे निश्चित मत होते. पण असे असले तर अंती आपल्या पारतंत्र्याला, दैन्याला, दुबळेपणाला आपले आपणच कारण आहो या विचाराचा त्यांना कधीही विसर पडला नव्हता. इंग्रजांवर त्यांनी एकपट टीका केली असली तर स्वसमाजावर दसपट केली आहे. आपले अज्ञान, आपली देशाभिमानशून्यता, कूपमंडूक वृत्ती, आपल्या रक्तात भिनलेली निवृत्ती, आपली विषम समाजरचना, शास्त्रज्ञानाचा अभाव, हे आपले दुर्गुणच सर्व अनर्थाच्या वुडाशी आहेत हे ते कंठरवाने सांगत असत. हा दृष्टिकोनच समाजाचा उदय घडवून आणीत असतो. आपल्या सर्व अधःपाताचे खापर ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या माथी फोडून ते थोर पुरुष स्वस्थ बसले असते, तर शतकानुशतके आपण पारतंत्र्यातच राहिलो असतो. केमालपाशा