पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३
ते समाजाला विचारा

मागासलेला राहिला, त्याला कारणहि त्यांच्या मते ब्राह्मणच. ब्राह्मणांनी त्यांना शिक्षण घेऊ दिले नाही. सावकारी करून त्यांना छळले व भारताचे कल्याणकर्ते जे इंग्रज त्यांच्या राज्याला विरोध केला. वास्तविक ब्राह्मणेतरांना शिक्षण देणे न देणे हे या काळात ब्राह्मणांच्या हाती मुळीच नव्हते. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठीसुद्धा शाळा काढली होती, त्यावरून हे स्पष्ट आहे. राजर्षी शाहू, सयाजीराव गायकवाड, ग्वाल्हेरचे शिंदे यांनी, मराठ्यांनी शिकावे यासाठी फार प्रयत्न केले. पण त्या समाजाला त्याचे महत्त्व वाटले नाही. त्याने शिकावयाचे ठरविले असते तर त्याला अडविणे ब्राह्मणांना कालत्रयी शक्य झाले नसते. पण आपल्या मागासलेपणाला ब्राह्मणच जबाबदार आहेत, असे या पंडितांनी कायमचे ठरवून टाकले आहे. आणि दुर्दैव असे की या दुरवस्थेतून आपण आपल्या हिमतीवर सुटू शकणार नाही, इंग्रजच आपल्याला सोडवू शकतील हाही विचार त्यांनी बहुजनसमाजात दृढमूल करून टाकला. या एवढ्या काळात ब्राह्मण सावकार व गुजराती वाणी खेड्यातल्या कुणब्याला नागवीत होता हे खरेच आहे. पण हा अनर्थ टाळण्यासाठी मराठा सावकार, मराठा दुकानदार निर्माण करण्याचा प्रयत्न ब्राह्मणेतर धुरीणांनी मुळीच केला नाही. विज्ञानाच्या अभावामुळे, सृष्टिघटनांच्या अज्ञानामुळे, लोकभ्रमामुळे, बुद्धिवादाच्या अभावामुळे, गरीब जनता पुरोहितवर्गाच्या वर्चस्वाखाली येते. त्यातून तिला सोडविण्यासाठी भौतिक ज्ञानाचा प्रसार करणे हा एकमेव उपाय आहे. पण ब्राह्मणेतरांनी हा प्रयत्न मुळीच केला नाही. तरीपण आपल्या अधःपाताला आपण जबाबदार आहो असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे या समाजातून ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी जसे कर्तृत्वशाली पुरुष निर्माण झाले तसे गेल्या शंभर वर्षात झाले नाहीत. भारतातील इतर प्रांतातून महात्माजी, वल्लभभाई, विठ्ठलभाई, स्वामी विवेकानंद, स्वामी श्रद्धानंद, लजपतराय, डॉ. राजेंद्रप्रसाद हे जसे अखिल भारताचे नेतृत्व करण्यास समर्थ असलेले पुरुष ब्राह्मणेतर समाजात निर्माण झाले तसे महाराष्ट्रात झाले नाहीत. इतिहासकार, तत्त्ववेत्ते, वक्ते, कवी, नाटककार, गणितज्ञ, अर्थवेत्ते हेही त्या समाजातून उदयास आले नाहीत. १९३० नंतर, इंग्रज आपले त्राते, ही भावना या समाजातून गेली. पण अजूनही हा समाज अंतर्मुख होऊन आत्मसंशोधन करीत नाही. आपल्या अधःपाताला