पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
वैयक्तिक व सामाजिक

सामान्यतः या देशात या दीर्घकालखंडात 'आपण बद्ध आहो, पराधीन आहो, दैवायत्त आहो, प्रवाहपतित आहो, प्राक्तनात असेल तसे होणार आहे, विधिलिखित चुकत नाही', हेच तत्त्वज्ञान जनमानसात दृढमूल झाले होते, याविषयी दुमत होईलसे वाटत नाही.
 आपण परिस्थितिवश आहो, आपल्या हाती काही नाही, आपल्या अपकर्षाची जबाबदारी आपल्यावर नाही, आपला उत्कर्ष साधणे आपल्या हाती नाही हे तत्त्वज्ञान ज्या समाजाने पत्करले त्याचा कसा अध:पात होतो, तो कसा कर्तृत्वहीन होतो हे पाहण्यासाठी अगदी नजीकचे उदाहरण घ्या. ते म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर समाजाचे. १८५० पासून या समाजाने असले तत्त्वज्ञान पत्करले आहे. आपल्या नाशाला, अधःपाताला दरवेळी ब्राह्मण कारणीभूत झाले आहेत, असे हा समाज आज शंभर वर्षे मानीत आला आहे आणि अजूनही मानीत आहे. कौरवपांडवांपासून आज हजारो वर्षे क्षत्रिय राजे आपसात लढत आहेत व स्वतःचा नाश करून घेत आहेत. पण महात्मा फुले व त्यांचे अनुयायी यांचे मत असे की क्षत्रिय लढले ते ब्राह्मणांच्या चिथावणीमुळे लढले. लढू नये हे त्यांना कळत होते. पण ब्राह्मणांनी त्यांच्यात कलह लावून दिला. दशरथाने रामाला वनात हाकलून दिले व रामाने पुढे सीतात्याग केला हे सर्व ब्राह्मणांनी घडवून आणले. आपल्या समाजात अस्पृश्यता आहे. जातिभेद आहे. चातुर्वर्ण्य आहे. या सगळ्यांचे सर्व क्षत्रिय राजांनी अट्टाहासाने रक्षण केले आहे. म्हणजे समाजातील या विषमतेला क्षत्रिय फार जबाबदार आहेत. पण ब्राह्मणेतर पंडितांचे म्हणणे आहे की ब्राह्मणांनी हा विषमतेचा धर्म लिहिला व मग त्यांच्यावर कृपा म्हणून क्षत्रियराजांनी त्याला पाठिंबा दिला ! तेव्हा त्यातून जी अनर्थपरंपरा ओढवली तिला आम्ही जबाबदार नाही. ते अपश्रेय ब्राह्मणांचे आहे. अनेक क्षत्रिय राजे, सरदार स्वामिद्रोही झाले. देशद्रोही झाले. पण ते ब्राह्मणांचेच कारस्थान. क्षत्रिय भोळे असतात, ब्राह्मण त्यांना सहज फसवितात. तेव्हा स्वामिद्रोहाची, देशद्रोहाची जबाबदारी त्यांच्यावर येत नाही. (या विषयाचे सविस्तर विवेचन 'भारतीय लोकसत्ता" या माझ्या ग्रंथात 'ब्राह्मण-ब्राह्मणेतरवाद' या प्रकरणात केलेले आहे.) मागल्या काळाविषयी असे लिहून ब्राह्मणेतर पंडित थांबले नाहीत. १८५० च्या नंतरच्या काळातहि मराठा समाज व इतर ब्राह्मणेतर समाज