पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४१
ते समाजाला विचारा

असतील तर त्याला ते मुळीच जबाबदार नाहीत, असे अनेक पंडितांचे मत आहे. आपल्या प्रस्तुत विवेचनाच्या दृष्टीने याला महत्त्व नाही. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा समाजाने काय अर्थ केला, याला महत्त्व आहे. कारण मूळ तत्त्व कसेही असले तरी समाज त्याचा अर्थ व आचार काय करील यावर त्याचा उत्कर्षापकर्ष अवलंबून राहणार हे उघड आहे. गीतेच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होईल. श्रीकृष्णाच्या मनात गीतातत्त्वाचा एकच अर्थ असेल. पण आज गीतेचे अनेक तऱ्हांनी अर्थ लावले जातात. गीता निवृत्तिपर आहे की प्रवृत्तिपर हा मोठाच वाद आहे. आणि मूळ गीतेची जेव्हा चर्चा करावयाची असेल तेव्हा त्याला फारच महत्त्व आहे. प्रस्तुत विचाराच्या दृष्टीने कोणच्या काळी समाजाने त्याचा कोणता अर्थ केला आणि त्याचे परिणाम काय झाले एवढ्याच प्रश्नाला महत्त्व आहे. 'जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले', 'मुख्य पूजेचे आयतन प्राणिमात्रा सुखदान', 'दया करणे जे पुत्रासि तेचि दासा आणि दासी' अशी अनेक वचने आपल्या संतवाङ्मयात आहेत. तशी धर्मग्रंथातही आहेत. पण आपण फक्त वैयक्तिक पुण्याच्या दृष्टीनेच त्यांचा विचार केला आणि युरोपीय लोकांनी, सामाजिक पुण्याच्या दृष्टीने त्यांचा अर्थ लावला. त्यामुळे त्यांच्या व आपल्या वैभवात जमीनअस्मानाचे अंतर पडले. ते सर्व जगाचे जेते झाले व आपण सर्व जगाचे दास झालो. तेव्हा मूळ तत्त्वज्ञानाचा कोणता अर्थ समाजात रूढ होतो त्यालाच फक्त प्रस्तुतच्या विवेचनाच्या दृष्टीने महत्त्व आहे, हे ध्यानी घ्यावे.
 त्या दृष्टीने पाहता पूर्वकर्म ही नियती आहे, मनुष्य स्वतःचे भवितव्य ठरविण्यास असमर्थ आहे, त्याला कसलेहि इच्छास्वातंत्र्य नाही, कर्माच्या रहाटगाडग्यात सापडल्यावर गाडग्याप्रमाणे वरखाली फिरत राहणे एवढेच मनुष्याच्या हाती आहे, हे तत्त्वज्ञान भारतात आणि एकंदर पूर्वेकडच्या बहुतेक देशात अनेक शतके रूढ झाले होते आणि त्यामुळेच हे देश या काळात जीवहीन, चैतन्यहीन होऊन गेले होते, हे कोणालाही मान्य करावे लागेल असे वाटते. या काळात मधूनमधून काही पराक्रमी महापुरुष निर्माण झाले हे खरे; पण त्यांनी हे कर्मतत्त्व, ती निवृत्ती, ती कालवशता, ती जन्मवशता, हे सर्व उधळून दिले होते असे इतिहास सांगतो. त्यांच्या हातून पराक्रम झाले आणि काही काल त्यांचा समाज उत्कर्ष पावला याचे कारण हेच आहे. पण