पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
वैयक्तिक व सामाजिक

स्वातंत्र्य असे काही नसते हेही मत वरच्याप्रमाणेच येथे दृढमूल झालेले आहे. किंबहुना ही दोन्ही मते एकच आहेत असे पुष्कळ लोक मानतात.

ईश्वरः सर्व भूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति
भ्रामयन् सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया - गीता १८.६१

 ईश्वर हा सर्व प्राणिमात्रांना यंत्रावर चढवून आपल्या मायेने त्यांना फिरवीत असतो, असे गीता सांगते. परमेश्वराची ही माया म्हणजेच कर्म होय. या कर्माने मनुष्य बद्ध आहे. परमेश्वराची त्याने भक्ती केली तर त्यातून तो मुक्त होईल. पण भक्ति करावी ही बुद्धी होणे न होणं हे सुद्धा कर्मावर अवलंबून आहे. कारण 'बुद्धिः कर्मानुसारिणी !' केवळ मानवच या कर्माने बद्ध आहे असे नव्हे तर ब्रह्मा, विष्णु, शंकर, सूर्य, इन्द्र इ. सर्व देवहि या चक्रात सापडलेले आहेत, अशा अर्थाची अनेक वचने संस्कृतात आहेत. भर्तृहरीने तर म्हटले आहे की, सर्व देव असे कर्मवश असल्यामुळे त्यांना नमस्कार करण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा कर्माला करावा हे बरे.
 मनुष्य कर्माने बद्ध आहे याचाच अर्थ असा की त्याला इच्छा-स्वातंत्र्य किंवा प्रवृत्ति-स्वातंत्र्य नाही. आणि मग अर्थातच त्याच्या भवितव्याला तो जबाबदार नाही. हे मत आपल्या समाजात रूढ झाल्यामुळे या देशाला सात आठ शतके कोणची दुर्गती प्राप्त झाली होती हे इतिहास सांगतोच आहे. कर्मतत्त्वावरील श्रद्धेमुळे माणसे दैववादी होतात आणि त्यांच्या ठायीचे सर्व कर्तृत्व नष्ट होते. यातूनच निवृत्तिवाद निर्माण होऊन त्याने सर्व समाजाला एकदा ग्रासले की तमोयुग निर्माण होऊन समाज शतकानुशतके अज्ञान, दारिद्र्य, पारतंत्र्य या नरकवासात खितपत पडतो. ब्रिटिश येथे येण्यापूर्वी सात आठ शतके भारत असाच तमोयुगात निश्चेष्ट होऊन पडला होता, त्याचे कारण हेच आहे. मानव बद्ध आहे, त्याला प्रवृत्तिस्वातंत्र्य नाही या तत्त्वावरील श्रद्धा !
 येथे एक खुलासा करणे अवश्य आहे. भारतातल्या कर्मतत्त्वाचा असा अर्थ आहे की नाही याविषयी मतभेद असणे शक्य आहे, नव्हे तसे आहेतच. तसेच मार्क्सचे ऐतिहासिक आवश्यकतेचे तत्त्व व फ्रॉइडचे (लिबिडो) कामगंडाचे तत्त्व याबद्दलहि मतभेद आहेत. वर या दोन तत्त्ववेत्त्यांच्या मतांचे जे अर्थ केले आहेत तसे ते नाहीत आणि त्यामुळे त्यातून जर काही अनर्थ झाले