पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९
ते समाजाला विचारा

अनेक घटना शास्त्रीय कक्षेत येण्याचे नाकारीत आहेत, शास्त्र त्यांच्यापुढे हतबुद्ध होऊन बसले आहे, हे ते जगाच्या निदर्शनाला आणीत आहेत. यावरून आपण हे जाणले पाहिजे की मानवी मन अजून बव्हंशी अज्ञात आहे. कार्यकारणाच्या कैचीत ते कधीही बसणार नाही. आणि याचाच अर्थ असा की व्यक्तीला आत्मस्वातंत्र्य आहे. व्यक्तीच्या मनावर अनुवंश, भौगोलिक परिस्थिति, घर, शाळा, धर्मपीठ येथे होणारे विविध संस्कार या सर्वांचा परिणाम होत असतो. पण त्याच्याही पलीकडे मनुष्याचे मन म्हणून काही राहतेच. कारण या सर्व संस्कारांच्या अगदी विरुद्धही अनेक वेळा त्याची ठेवण झालेली असते, हे व्यवहारांत पदोपदी आपल्या अनुभवास येते. अमकी परिस्थिति म्हणजे असा मनुष्य, हे मुळीच ठरलेले नाही. धनाच्या साह्याने काही माणसे श्रेष्ठपदी जातात, काहींचा अधःपात होतो. संकटातच काही माणसांचे कर्तृत्व उमलून येते तर काहींचे संकटाने करपून जाते. यावरून असे स्पष्ट दिसते की परिस्थितीला उलट सुलट कलाटण्या देणारी, तिच्या निरपेक्ष मानवी भवितव्याला वळण लावणारी अशी मनुष्याच्या ठायी एक अंतस्थ शक्ती आहे. आणि कोणत्याहि नियमात ती बसत नसल्यामुळे ती स्वतंत्र आहे हे मान्य करावेच लागते.
 हे मान्य करताच, मनुष्याच्या बऱ्यावाईट कृत्यांच्या परिणामांना तो जबाबदार नाही, परिस्थिति जबाबदार आहे, तेव्हा गुन्हेगारांना गुन्हेगार न मानता रुग्ण मानावे व त्यांना शिक्षा न करता त्यांच्यावर मानसोपचार करावे, या सगळ्या अर्वाचीन कल्पना म्हणजे वाऱ्यावरच्या वावड्या आहेत, त्यांना शास्त्रीय आधार कसलाहि नाही, हे आपल्या ध्यानात येईल.
 ही सर्व शास्त्रीय चर्चा झाली. मनुष्य स्वतःच्या बऱ्यावाईट कृत्यांच्या परिणामांना जबाबदार आहे की नाही हा केवळ तात्त्विक चर्चेचा विषय असता तर त्याचा एवढा खल करण्याचे कारणही पडले नसते. पण तसे नाही. हा विषय समाजाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. कारण समाजाचा उत्कर्षापकर्ष, यांपैकी कोणते मत लोक स्वीकारतात, त्यावर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारताने अनेक शतके कर्मतत्त्वाचा स्वीकार केला होता. पूर्वजन्मीच्या कर्माने मनुष्य बद्ध आहे. त्यातून मुक्त होणे त्याला जवळ जवळ अशक्य आहे, असे मत येथे हजारो वर्षे रूढ आहे. परमेश्वर जगाचा सूत्रधार आहे आणि सर्व मानवप्राणी तो लीलानाटक बाहुल्याप्रमाणे खेळवीत असतो, त्यांना