पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
वैयक्तिक व सामाजिक

हे त्यांनी दाखवून दिले आहे. ते म्हणतात की, ज्यामुळे काहीही सिद्ध होते, त्याने काहीही सिद्ध होत नाही, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. शेवटी फ्रॉइडचा नियतिवाद हा प्रत्यक्ष अनुभवाच्या कसोटीला टिकणे शक्य नाही, त्याच्यावर फ्रॉइडने टाकलेला भार पेलण्यास तो असमर्थ आहे असा त्यांनी निर्णय दिला आहे. (फ्रॉइड- हिज ड्रीम अँड सेक्स थिअरीज्- प्रकरण ७ वे) 'लिमिटेशन्स् ऑफ सायन्स' या आपल्या ग्रंथात फ्रॉइडविषयी चर्चा करताना प्रख्यात शास्त्रज्ञ जे. डब्ल्यू. एन्. सुलिव्हान म्हणतात की, 'मनुष्याच्या अत्यंत विविध प्रकारच्या कृति, त्याच्या वागणुकीतल्या सर्व लहानमोठ्या गोष्टी या कामगंडाने प्रेरित आहेत असे म्हणणे आणि त्या परमेश्वरप्रेरित आहेत असे म्हणणे एकच आहे. ज्या स्पष्टीकरणाने प्रत्येक गोष्ट स्पष्ट होते त्याने काहीच स्पष्ट होत नाही.-' (पृ. २०१).
 फ्रॉइडमताविषयीचा हा अभिप्राय फार महत्त्वाचा आहे. मानवी जीवन संपूर्णपणे कधीच उलगडून दाखविता येणार नाही. जडसृष्टीप्रमाणे शास्त्रीय नियमांच्या किवा कार्यकारणांच्या कैचीत ते बसवून दाखविणे हे अगदी अशक्य आहे, असा त्याचा अर्थ आहे. अशा स्थितीत कोणी तसा प्रयत्न केला तर जुन्या काळच्या परमेश्वराचाच त्यांना आश्रय करावा लागतो. हे शास्त्रज्ञ त्याला प्रत्यक्ष परमेश्वर म्हणणार नाहीत हे खरे. आपण काही शास्त्र सांगत आहो अशीच प्रौढी ते मिरवीत राहणार. पण त्यांनी मानलेली प्रेरकशक्ती ही सर्वंकष आहे, प्रत्येक गोष्ट तिने स्पष्ट करता येते, हे दाखविण्यासाठी ते जी ओढाताण करतात, वाटेल तसे धागेदोरे जोडतात, जे कार्यकारणसंबंध जुळवितात, ते पाहिले की, धर्मभोळे लोक प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी नेऊन भिडविताना जी ओढाताण करतात ती व ही एकच आहे असे दिसू लागते. मार्क्सची ऐतिहासिक आवश्यकता ही अशीच अंबाभवानीसारखी आहे. ती सर्वव्यापी, सर्वसमर्थ, सर्वसाक्षी आहे. आर्थिक प्रगति खुंटताच ती अवतार घेते आणि जळी स्थळी, काष्ठी, पाषाणी भक्तांना दर्शन देते. शास्त्रज्ञांचा अभिप्राय असा की मानवी जीवनाच्या संबंधात अशी शक्ती मानणे आणि परमेश्वर मानणे यात फरक नाही.
 या दोघाही थोर शास्त्रज्ञांनी मानसशास्त्र हे शास्त्र नव्हे असे तर सांगितले आहेच. पण शिवाय जडशास्त्रांच्या ज्ञानालाहि आज मर्यादा पडत आहेत आणि