पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७
ते समाजाला विचारा

दोन्ही सारखेच नियतिवादी आहेत. गुन्हेगारांना रोगी मानावे हे तत्त्व जगाने फ्रॉइडच्या सांगण्यावरून स्वीकारले आहे आणि प्रत्यक्ष आचरणांत आणले आहे.
 मानवाच्या स्वाभाविक प्रवृत्ती या समाजविघातक आहेत. पण समाजात राहावयाचे तर त्या प्रवृत्ती मानवाला नियंत्रित कराव्या लागतात, दडपून टाकाव्या लागतात. यांतल्या काही अपप्रवृत्तींचे उन्नयन होते आणि त्यामुळे व्यक्ती श्रेष्ठपदाला जाते व समाजाचीही प्रगति होते. पण बऱ्याचशा प्रवृत्ती राखेखाली अग्नि राहावा तशा सुप्त अवस्थेत राहतात, आणि अनेक मार्गांनी मनुष्याचे वर्तन नियत करतात असे थोडक्यात फ्रॉइडचे मानसशास्त्र आहे. 'सायकोपॅथॉलजी ऑफ एव्हरी-डे लाइफ' असा एक ग्रंथ त्याने लिहिला आहे. त्यात आपल्या दैनंदिन व्यवहारातील नाव विसरणे, काम विसरणे, वाचताना शब्द चुकणे, लिहिताना तो चुकीचा लिहिणे, एखाद्या विशिष्ट आकड्याकडे विशेष कल असणे, मनात एक विचार असून नकळत कृती दुसरीच होणे, या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण लहानपणी दडपलेल्या भावना, आकांक्षा अप्रीती यांच्या संदर्भातून त्याने दिले आहे. तीन हा आकडा तुम्ही विसरला तर लहानपणी तीन नंबरच्या बहिणीशी तुमचे भांडण होत असे हे त्याचे कारण. केळी आणायची असून तुम्ही आणली नाहीत तर लहानपणी केव्हा तरी वडिलांच्या हातचा केळ्यावरून तुम्ही मार खाल्ला असावा, किंवा केळ्यावरून तुम्ही घसरून पडला असावा हे त्याचे कारण. सावली हा शब्द लिहिताना तुम्ही चुकलात तर लहानपणी अस्पृश्यांची सावली घेऊं नये हा विचार तुमच्या मनावर ठसविला गेला होता, हे त्याचे कारण. असे प्रत्येक कृतीचे मूळ कारण या निरुद्ध भावनात असते हेच त्याने या सर्व ग्रंथात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचीत असताना, ते लिहिताना लेखक शुद्धीवर नसावा अशी शंका येते. एरवी ती बोलून दाखविण्याचे धैर्य मला झाले नसते. पण अनेक मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी याच शब्दांत त्याची संभावना केली आहे. प्रा. जोसेफ जॉस्ट्रो यांनी फ्रॉइडने मानवी मनाच्या अभ्यासाची एक नवी दिशा दाखविली हे मान्य करूनहि त्याची स्वप्नांची व दैनंदिन व्यवहारातील चुकांची शेकडो स्पष्टीकरणे केवळ हास्यास्पद व वेडगळ आहेत असे म्हटले आहे. या तर्कप्रणालीने वाटेल ते सिद्ध करता येईल आणि त्यामुळे अनेक अनर्थ घडतील