पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
वैयक्तिक व सामाजिक

त्याच्यावर जे बाह्य संस्कार होतील त्यांवर अवलंबून असते, त्याचे निराळे स्वत्व, त्याची अंतःशक्ती असे काही नसते, असा या पंथाचा सिद्धान्त आहे. हे मत डॉ. वॉटसनने इतक्या टोकाला नेले आहे की कोणत्याही व्यक्तीवर इष्ट ते संस्कार करून तिचे जीवन वाटेल त्या नमुन्याप्रमाणे घडविता येईल अशी तो ग्वाही देतो. 'मला एक डझन निरोगी मुले आणि त्यांचे योग्य व इष्ट ते संगोपन करण्यासाठी आवश्यक ती परिस्थिति व सामग्री द्या. मी तुम्हाला त्या मुलांतून वाटेल त्या प्रकारचा मनुष्य- वैद्य, वकील, शास्त्रज्ञ, व्यापारी, भिकारी, चोर, गुन्हेगार निर्माण करून दाखवीन,' असे आव्हानाचे उद्गार त्याने काढले आहेत. याचा अर्थ असा की न्यूटन, नेल्सन, टिळक, गांधी यांच्यासारखे थोर पुरुष किंवा टाटा-बिर्ला यांसारखे कारखानदार, किंवा भूपत, डिलिंजरसारखे दरोडेखोर हुकमी निर्माण करणे समाजाच्या हाती आहे. हा परिस्थितिवाद मार्क्सवादापेक्षाही जास्त धाडसी आहे. अमक्या परिस्थितीमुळे अमका मनुष्य निर्माण होणारच असे मार्क्सवाद म्हणतो, तर वाटेल त्या कर्तृत्वाचा मनुष्य, भोवती इष्ट ती परिस्थिती कायम राखून, इच्छेप्रमाणे निर्माण करता येईल असा वर्तनवादाचा विश्वास आहे. जगाच्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने इष्ट तो मनुष्य निर्मिण्याचा हा प्रयोग अजून वर्तनवादी लोकांनी केलेला नाही. एवढे सामर्थ्य आपल्या ठायी आहे असा आत्मविश्वास असूनहि डॉ. वॉटसन याने मानसशास्त्राचा व्यवसायच पुढे सोडून दिला आणि तो व्यापारात शिरला. त्याच्या अनुयायांनीही हे विधात्याचे कार्य पुढे कघी करण्याचे मनात आणले नाही. कारण आपल्याला मन आहे हेच त्यांना मान्य नव्हते.
 गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याच्या जबाबदारीतून मुक्त करणारा दुसरा मानसशास्त्रातला पंथ म्हणजे फ्रॉइडचा पंथ होय. डॉ. वॉटसनचा वर्तनवाद एकेकाळी बराच गाजला असला तरी लोकमतावर त्याचा फारसा प्रभाव कधी पडला नाही. कारण प्रत्येकाला स्वानुभूतीने जाणवणारे मन अस्तित्वातच नाही, असा विचित्र दावा त्याने मांडला होता. डॉ. फ्रॉइडच्या मनोविश्लेपणपंथाचे मात्र तसे नाही; आज मार्क्सवादाइतकेच याचे जगावर वर्चस्व आहे. वॉटसन मन नाहीच असे मानतो, आणि फ्रॉइड मनच सर्व आहे असे मानतो. पण आत्मस्वातंत्र्याच्या, मनुष्याच्या स्वतंत्र इच्छाशक्तीच्या दृष्टीने