पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५
ते समाजाला विचारा

मार्क्सवाद भविष्ये वर्तवितो हे सर्वश्रुत आहे. कम्युनिस्ट क्रांती प्रथम ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या औद्यागिक दृष्टीने प्रगत असलेल्या देशात घडेल असे भविष्य मार्क्स एंजल्स यांनी वर्तविले होते हे प्रसिद्धच आहे. मानवाच्या ठायी काही स्वतंत्र शक्ती आहे, त्याच्या अंगी अज्ञात, अनाकलनीय, तर्कसिद्ध कार्यकारणात न बसणारे असे काही सामर्थ्य असू शकते, त्याच्या जोरावर तो परिस्थितीला एकदम हवी ती कलाटणी देऊ शकतो, अनपेक्षित, अपूर्वज्ञात असे काही घडवू शकतो, हे मार्क्सला मान्य नाही हे यावरून उघड दिसते. तसे नसते तर भविष्य वर्तविण्याचे धैर्य त्याला झाले नसते.
 मनुष्याने वाममार्गाचा अवलंब केला, गुन्हा केला, खून केला तरी त्याला गुन्हेगार मानू नये, परिस्थितीमुळे त्याच्या हातून ते कृत्य घडले, त्याला तो जबाबदार नाही, असे मानून त्याला सहानुभूतीने वागवावे, भाई म्हणावे, आपल्या हातून भ्रूणहत्येसारखे पाप घडले आणि त्यासाठी आपल्याला कोणी जाब विचारला तर, 'ते समाजाला विचारा' असे उत्तर त्याला द्यावे, यामागे जी विचारसरणी आहे ती समाजमनात दृढमूल होण्यास मार्क्सवाद कसा जबाबदार आहे हे यावरून कळून येईल. मनुष्याला काही स्वतंत्र अशी मनःशक्ती नाही, जडाप्रमाणे त्याची बुद्धी अगदी तर्कसिद्ध, कार्यकारणबद्ध आहे, त्याला आत्मस्वातंत्र्य म्हणून काही नाही हा पक्ष एकदा स्वीकारल्यानंतर 'ते समाजाला विचारा' ही विचारसरणी क्रमप्राप्तच आहे.
 मनुष्याला सर्वस्वी परतंत्र करून टाकण्यास, त्याचे आत्मस्वातंत्र्य हिरावून घेण्यास मार्क्सवाद जसा कारणीभूत झाला आहे त्याचप्रमाणे अर्वाचीन काळातले मानसशास्त्रातले दोन पंथ कारणीभूत झाले आहेत. ते पंथ म्हणजे डॉ. वॉटसन यांचा वर्तनवाद व डॉ. फ्रॉइड यांचा मनोविश्लेषणवाद. वर्तनवादाचा प्रवर्तक डॉ. वॉटसन हा मनाचे अस्तित्वच मानण्यास तयार नाही; विचार, कल्पना, स्मृती, रागद्वेष इ. भावना या सर्व शरीरप्रकृती होत, असे त्यांचे मत आहे. रुधिराभिसरण, काही ग्रंथींचे चलनवलन, मेंदूतील व इतर अवयवांतील नसांची व धमन्यांची हालचाल यांची ही केवळ निदर्शके होत, हे स्वतंत्र असे मनोव्यापार नव्हत, असे वर्तनवाद मानतो. त्यामुळे लाकूड, लोखंड, माती यांचे रूप व स्थिती ही ज्याप्रमाणे बाहेरून आपण त्यांवर जे संस्कार करू त्यावर अवलंबून असतात त्याप्रमाणे मानवांचे सर्व भवितव्य