पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
वैयक्तिक व सामाजिक

शेतकरी, कामकरी, बुद्धिजीवी, व्यापारी, भांडवलदार, कारखानदार असे मार्क्सने समाजातील लोकांचे आर्थिक दृष्टीने भिन्न वर्ग कल्पिले आहेत. आणि जुन्या चातुर्वर्ण्यातील जन्मसिद्ध गुणांप्रमाणेच यांचेही वर्गसिद्ध गुण सांगून टाकले आहेत. कामकरी हाच क्रांतीला अवश्य असणाऱ्या गुणांनी संपन्न असावयाचा, बुद्धिजीवी वर्ग हा नेहमी भांडवलदार- कारखानदारांचा दास, गुलाम असावयाचा, भांडवलदार, जमीनदार हे नेहमी क्रांतीचे विरोधक असावयाचे, असा गुणनिश्चय त्याने एकदाच करून टाकला आहे. चातुर्वर्ण्य- व्यवस्थेत ज्याप्रमाणे जन्माने मनुष्याची गुणसंपदा व त्यामुळे नियती निश्चित होते त्याचप्रमाणे साम्यवादी व्यवस्थेत वर्गाने मनुष्याची नियती निश्चित होते असे मार्क्सवाद मानतो. अवतारकल्पनाही मार्क्सला मान्य आहे. पृथ्वीला पापकृत्यांचा फार भार झाला की परमेश्वर साधूंच्या परित्राणासाठी व दुष्कृतांच्या विनाशासाठी अवतार घेतो अशी भारतीयांची श्रद्धा आहे. मार्क्सवादीचीही आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने न्यूटन, नेपोलियन, गॅलिलिओ, गांधी यांसारख्या विशिष्ट कर्तृत्वाच्या पुरुषांची ऐतिहासिक आवश्यकता निर्माण झाली की ते त्या त्या देशात निर्माण होतात व आपापले ऐतिहासिक कार्य करून निघून जातात अशी श्रद्धा आहे. या सगळ्याचा अर्थ असा की, मानवाच्या हातून जे काही बरेवाईट कार्य घडते ते त्याच्या विशिष्ट वर्गामुळे, आणि त्या वेळच्या ऐतिहासिक परिस्थितीमुळे घडते; त्याची स्वतंत्र इच्छाशक्ती अशी काही नसते, किंवा असलीच तर ती संपूर्णपणे बद्ध अशी असते; त्यामुळे अर्थातच त्याच्या हातून घडलेल्या कृत्यांचे जे बरेवाईट परिणाम त्यांना तो जबाबदार नसतो.
 स्वतः मार्क्स व त्याचे अनुयायी यांची या सिद्धान्तांवर इतकी दृढ श्रद्धा आहे आहे की ते ज्योतिष्याप्रमाणे भविष्यही वर्तवितात आणि कोणत्या देशात केव्हा कशा प्रकारची क्रांती घडेल, कोठे घडणार नाही, कोठे परागति होईल हे आपण अचूक सांगू शकतो असे त्यांचे मत आहे. माणूस जेव्हा भविष्य वर्तवितो तेव्हा भावी घटनांच्या मागच्या मानवासुद्धा सर्व प्रेरक शक्ती या नियतिबद्ध आहेत, त्यांना स्वातंत्र्य म्हणून कसलेही नाही हे त्याने गृहीत धरले असलेच पाहिजे. त्यावाचून मानवी इतिहासाविषयी रविचंद्रांचे अस्तोदय, ग्रहणे यांच्याइतकी निश्चित भविष्ये वर्तविण्याचा विचारहि त्याला करता येणार नाही. आणि