पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
 ३३
ते समाजाला विचारा

काही संबंध नाही असे मत सर्वत्र रूढ होते. कामगारांचे त्या काळात भयंकर हाल होत असत. त्यांचे जीवन म्हणजे नरकवास होता. पण समाजाचे त्या बाबतीत काही कर्तव्य आहे हे व्यक्तिवादी अर्थशास्त्राला मान्यच नव्हते. 'ज्याचा तो' हे त्याचे तत्त्व होते. यावर गेल्या शतकाच्या उत्तरार्धात चौफेर हल्ले होत होते हे खरे आहे. कार्ल मार्क्स, रस्किन, कार्लाइल यांनी आपापल्या परी त्याच्यावर भडिमार चालविला होता. इंग्लंडमध्ये व जर्मनीत कामगारांच्या कल्याणाचे काही कायदे सरकारने केलेही होते. पण अजून व्यक्तिवादी तत्त्वज्ञान जोर करूनच होते. डार्विनच्या 'नैसर्गिक निवडी'च्या व '-जीवनकलहा-'च्या सिद्धान्तांनी त्याला काही काळ पाठिंबाच मिळाला. त्यामुळे व्यक्ती अगदी असहाय व निराधार होऊन समाजात अनर्थ घडत होते. यालाच उद्देशून रस्किनने आपला 'अर्थशास्त्र की अनर्थशास्त्र ?' हा ग्रंथ लिहिला होता. तरी त्या वेळी त्याचा प्रभाव पडला नाही. उलट त्यालाच पंडितांनी प्रतिगामी ठरविले.
 पण हळूहळू व्यक्ती आपल्या स्थितीला, उन्नति- अवनतीला सर्वस्वी जबाबदार नाही, तिचे भवितव्य बरेचसे सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते, हे मत प्रभावी होऊ लागले आणि आता लंबकाला जबरदस्त हेलकावा बसलेला असून तो दुसऱ्या टोकाला गेला आहे, असे आपल्याला दिसत आहे. प्रारंभी दिलेली उदाहरणे व वचने त्याचीच निदर्शक आहेत. ती पाहता आज आपण दुसऱ्या अनर्थयुगात प्रविष्ट झालो आहोत असे वाटू लागते.
 या दुसऱ्या अनर्थयुगाला प्रामुख्याने मार्क्स व फ्रॉईड यांचे तत्त्वज्ञान कारणीभूत झालेले आहे. मार्क्सचा आर्थिक नियतिवाद प्रसिद्धच आहे. समाजात जी अर्थोत्पादनसाधने असतात, अर्थाच्या, वाटपाच्या व विनिमयाच्या ज्या पद्धती समाजाने रूढ केलेल्या असतात, त्यांवर त्या समाजाची सर्व संस्कृती अवलंबून असते, असा मार्क्सचा सिद्धान्त आहे. जुन्या काळी परमेश्वर सूत्रधार असून मानव म्हणजे त्याच्या हातातील कळसूत्री बाहुली आहेत, असे मत बहुतेक सर्व धर्मग्रंथांत सांगितलेले असे. मार्क्सचा हा आर्थिक नियतिवाद त्याहून फारसा निराळा नाही. मानवाचे कर्तृत्वच मार्क्सवाद अमान्य करतो असे नाही. पण ते कर्तृत्व कसे घडावयाचे, त्याचे स्वरूप काय, यशापयश काय, हे सर्व त्याच्या आर्थिक परिस्थितीने निश्चित होते, असे मार्क्स सांगतो.
 वै. सा.... ३