पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२ 
वैयक्तिक व सामाजिक

 १९२९ साली अब्दुल रशीद या मुसलमान तरुणाने स्वामी श्रद्धानंद यांचा खून केला. त्या वेळी गोहत्ती येथे काँग्रेसचे अधिवेशन चालू होते. त्या सभेत गांधीजी म्हणाले, 'मी अबदुल रशीदला माझा भाऊच मानतो. पुन्हा सांगतो, तो मला भावासारखा आहे. त्याला मी गुन्हेगार मानीतच नाही. हिंदु-मुसलमानांमध्ये वैर पेटवून ज्यांनी हा प्रक्षोभ घडविला तेच खरे गुन्हेगार आहेत. स्वामींच्या खुनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे, रशीदवर नाही.'
 व्यक्ति ही स्वतःच्या अपकृत्याला स्वतः जबाबदार नाही, परिस्थितीमुळे तिच्या ठायी पापप्रवृत्ती गुन्हेगारी वृत्ती निर्माण होते, आणि ती परिस्थिति समाजाने निर्माण केलेली असते, म्हणून अंती व्यक्तीच्या गुन्ह्यांची, तिने केलेले खून, बलात्कार या गुन्ह्यांची जबाबदारी समाजावर आहे. अशी ही अद्ययावत् विचारसरणी आहे. असे हे मानसशास्त्र आहे. आणि मुलांचे गृहशिक्षण, शालेय शिक्षण, गुन्हेगारांचे न्यायदान, त्यांचा तुरुंगवास या सर्व क्षेत्रात या मानसशास्त्राचा प्रभाव आता पडलेला दिसत आहे. भारतानेही सर्व क्षेत्रात या उदार धोरणाचाच अवलंब केला आहे. पण गेल्या बारा-पंधरा वर्षात सर्व क्षेत्रात गुन्हेगारी मात्र भयानक प्रमाणात वाढत आहे. तेव्हा याचा समाजधुरीणांनी जिव्हाळ्याने विचार केला पाहिजे, असे वाटते.
 गेल्या शतकाच्या अखेरीपर्यंत युरोपात स्वतःच्या बऱ्यावाईट अवस्थेला, उत्कर्षाला, भवितव्याला व्यक्ति ही संपूर्णपणे, सर्वस्वी स्वतःच जवाबदार आहे, असे तत्त्वज्ञान रूढ होते. १७७६ च्या सुमारास ॲडम स्मिथ या थोर इंग्रज अर्थकोविदाचा 'वेल्थ ऑफ नेशन्स्' हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. आणि तेथून पुढे इंग्लंड-अमेरिकेतील जीवनावर स्मिथच्या आर्थिक सिद्धान्तांचे शंभरसव्वाशे वर्षे अप्रतिहत वर्चस्व चालू होते. व्यक्तिवादी अर्थशास्त्र म्हणून हे शास्त्र प्रसिद्ध आहे. त्यातील इतर अंगोपांगांशी आपल्याला या ठिकाणी काही कर्तव्य नाही. आपल्याला त्यातला लक्षणीय सिद्धान्त एकच. आणि तो म्हणजे व्यक्तीच्या उत्तरदायित्वाविषयीचा ! वर निर्देशिलेली आजची जी शास्त्रपूत विचारसरणी तिच्या बरोबर उलट तो सिद्धान्त आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत व्यक्तीची जी बरीवाईट परिस्थिति असेल, तिला जे दारिद्र्य वा श्रीमंती प्राप्त झाली असेल, समाजात तिला जो हीन वा श्रेष्ठ दर्जा प्राप्त झाला असेल त्याला तीच सर्वस्वी उत्तरदायी आहे, त्याशी समाजाचा वा परिस्थितीचा