पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१
ते समाजाला विचारा

बेथ मॅसि हिल या एका अमेरिकन स्त्रीची तक्रार पाहा. ती म्हणते, "माझी एक मैत्रीण आहे. तिच्या दिराने तिच्या सर्व धनाचा अपहार केला व तो पळून गेला. त्यामुळे ती फार संतापली होती. पण एका मानसशास्त्रज्ञाने तिला उपदेश केला की, 'दिराला दोषी धरून तू त्याच्यावर संतापू नको. आता, तो सधन आहे, त्याला काही कमी नाही हे खरे. पण लहानपणी त्याला केव्हा तरी पैशाची नड फार तीव्रपणे भासली असली पाहिजे. आणि त्या वेळची त्याची ती धनाची तीव्र वासना दडपली गेली असली पाहिजे. ती या रूपाने प्रकट झाली. यात त्याचा दोष काय ? त्याच्याकडे उदार मनाने, सहानुभूतीनेच पाहिले पाहिजे." पुढे तिच्या एका बहिणीची मैत्रीण तिच्या नवऱ्याबरोबर पळून गेली. यातही मानसशास्त्रदृष्टीने रागावण्याजोगे काही नाही. एकपत्नीत्व हे पुरुषाच्या दृष्टीने अनैसर्गिकच आहे. ते समाजाने त्याच्यावर लादले आहे. त्याला ते संभाळता येत नाही म्हणून तो या स्त्रीबरोबर पळून गेला. यासाठी त्याला जबाबदार कसे धरता येईल ? जाब विचारावयाचाच असेल तर समाजाला विचारा. त्या मैत्रिणीबद्दलही असेच धोरण असणे अवश्य आहे. कोणच्याही वस्तूची चोरी करणे- येथे तिने आपल्या मैत्रिणीचा नवरा चोरला होता- हे योग्य नाही, अशी लहानपणी योग्य वेळी तिला शिकवण दिली गेली नसली पाहिजे. म्हणून तिची अशी प्रवृत्ति झाली. यात तिचा दोष नाही. म्हणून त्या दोघांवरही रागावू नका. उलट त्यांना घरी जेवावयाला बोलवा आणि मुलांना त्या स्त्रीला मावशी म्हणायला शिकवा.
 आपल्या अनुभवांतल्या या दोन गोष्टी सांगून एलिझाबेथ हिल अत्यंत उद्वेगून लिहिते, प्रत्येक दुष्ट प्रवृत्तीचे, अपकृत्याचे मूळ लहानपणच्या शिक्षणातील वैगुण्यात शोधावे, किंवा शारीर वा मानसिक अधूपणात आहे असे मानावे, असे हल्ली शास्त्र आहे. व्यक्तीला बुद्धि असते, तिला देवाने अक्कल दिली आहे, तिच्या कृत्याबद्दल तिलाच जबाबदार धरावी, हे कोणाला मान्यच नाही. दर ठिकाणी औदार्य, मृदुता, क्षमा ! मला या उदारमनस्कतेची चीड आली आहे. या पद्धतीने आईबापांवर, परिस्थितीवर वाटेल ते ढकलता येईल ! त्यापेक्षा मुलाला स्वतःला अक्कल आहे असे समजून त्याच्याशी तसे वागणे हेच श्रेयस्कर होईल. तुमच्या या नव्या पद्धतीने समाजाची किंवा व्यक्तीची प्रगति झाली आहे काय ?