पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डकऱ्यांच्या 'प्रेमसंन्यास' या नाटकातील द्रुमन ही एक तरुण विधवा आहे. कमलाकराच्या मोहजालात ती फसली व तिला दिवस गेले. मूल झाल्यावर बेअब्रू टाळण्यासाठी तिने मुलाचा गळा दाबून प्राण घेतला, पण ते उघडकीला आले. तिच्या खोलीत पोलिस आले आणि बाबासाहेबहि आले. तो सर्व प्रकार पाहून बाबासाहेबांना फार संताप आला. ते म्हणाले, "द्रुमन, राक्षसिणी, काय केलस हे ? हे अघोर कृत्य करायला तुझा हात कसा वाहवला?" यावर द्रुमन म्हणाली, "ते राक्षसी रूढीला विचारा, ते राक्षसी समाजाला विचारा."
 मुंबईच्या एका महाविद्यालयाचे एक प्राचार्य विद्यापीठाच्या सिडिकेटचे सभासदही होते. त्यांच्याकडे एकदा एक प्राध्यापक आपल्या एका विद्यार्थ्याचे प्रकरण घेऊन आले. त्या विद्यार्थ्याने परीक्षेत वाममार्गाचा अवलंब केला होता. म्हणून त्यासाठी नेमलेल्या समितीने त्याला तीन वर्षे निष्कासित केले होते. प्राचार्यांनी त्याच्यासाठी काही करावे असा प्राध्यापकांचा आग्रह होता. 'त्या विद्यार्थ्यावर चुकून आरोप आला आहे काय, तो प्रामाणिक असून काही गैरसमजामुळे त्याला शिक्षा झाली आहे काय ?' असे प्राचार्यांनी विचारले. तसे काही नव्हते. मुलगा अप्रामाणिक होता, त्याने फसवणूक निश्चित केली होती. पण प्राध्यापकांचे म्हणणे असे की, 'हा त्याचा दोष नाही. आपणच या विद्यापीठाच्या परीक्षांचे महत्त्व वाढवून ठेवले आहे. विद्यार्थ्यांचे सगळे भवितव्य समाजाने त्यावर अवलंबून ठेवले आहे. म्हणून त्यांना असा मोह होतो. यात त्यांचा दोष नाही. असला तर तो आपला आहे, समाजाचा आहे.' यावर थोडी चर्चा झाली. पण शेवटी प्राचार्यांनी प्राध्यापकांना सांगितले की,