पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
वैयक्तिक व सामाजिक

जातो. पक्षहित साधत नाही असे दिसले की नेत्यांची प्रतिकारबुद्धि पांगुळते. म्हणूनच अशा वेळी पक्षातीत धर्मसंघटनांची आवश्यकता असते. क्वेकर, मेथॉडिस्ट, साल्व्हेशन आर्मी या अशा संघटना होत्या. साल्व्हेशन आर्मीच्या इव्हँजेलाइन बूथने तर 'संग्राम, लढा ही मनुष्याची सहजप्रवृत्ति आहे ती जागृत करून हा धर्मसंग्राम चालू ठेवा' असाच शेवटचा संदेश दिला हे वर सांगितलेच आहे. समाज कितीही सुधारला, प्रगत झाला तरी अन्याय, विषमता, जुलूम, अत्याचार हे सर्व चालू राहणारच. म्हणूनच यांचे निर्मूलन करण्यासाठी धर्मसंघटनांचीही आवश्यकता नेहमी राहणार. म्हणूनच पाश्चात्त्य राष्ट्रांप्रमाणे धर्माचा नंदादीप आपण नित्य पाजळत ठेवला पाहिजे. लोकांचे अज्ञान, सत्ताधाऱ्यांचे स्वार्थ, धनिकांचा लोभ यांनी या दीपावर नित्य काजळी येत राहणार हे खरे आहे. म्हणूनच बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा यांच्या प्रकाशात आपण नित्य शोध घेत राहिले पाहिजे. अशी दृष्टि ठेवून धर्माचे पुनरुज्जीवन करणाऱ्या धर्मसंघटना येथे स्थापन झाल्या तरच ध्येयवाद, त्याग, संयम, निग्रह, आत्मार्पण वृत्ति हे मानवतेचे श्रेष्ठ सद्गुण येथे विकसित होतील आणि लोकायत्त समाज निर्माण करण्याचे आपले ध्येय साध्य होईल. त्यायोगेच 'त्रैलोक्य चालिल्या फौजा । सौख्यबंध विमोचने । मोहीम मांडली मोठी आनंदवनभूवनी ।।' हे समर्थांचे स्वप्न खरे होईल.